४ महिन्यांपूर्वीच्या अपघातावरून अभियंत्यांवर गुन्हा; रेल्वे कर्मचाऱ्यांनी काम थांबवत व्यक्त केला संताप
मुंबई : मुंबईकरांसाठी आजची सायंकाळ प्रवासाच्या दृष्टीने मोठी त्रासाची ठरली आहे. मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकात अचानक आंदोलन सुरू केल्याने लोकल रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. सायंकाळी साडेपाच वाजता मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन सुरू केले. त्यामुळे सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांपासून कल्याणच्या दिशेने (डाऊन लाईन) एकही रेल्वे गाडी धावलेली नाही, परिणामी सर्वच स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढली आहे.
ऐन संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी हे आंदोलन सुरू झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. डाऊन दिशेने जाणाऱ्या सर्व लोकल ट्रेन्स सीएसएमटी स्थानकातच उभ्या आहेत, ज्यामुळे फलाटांवर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
या अचानक आंदोलनामागे ४ महिन्यांपूर्वी झालेला एक अपघात कारणीभूत ठरला आहे. जून २०२५ मध्ये मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ लोकलच्या दरवाजात लटकून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची एकमेकांना धडक बसून अपघात झाला होता. यात ४ जणांचा मृत्यू झाला, तर ९ जण जखमी झाले होते.
या गंभीर अपघातानंतर, तब्बल चार महिन्यांनी लोहमार्ग पोलिसांनी रेल्वे विभागातील दोन विभागीय अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा (Culpuble Homicide) दाखल केला आहे. निष्काळजीपणा आणि ट्रॅक मेंटेनन्सकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका या अभियंत्यांवर ठेवण्यात आला आहे. याच कारवाईचा निषेध म्हणून मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांनी काम थांबवून आंदोलन सुरू केले आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांवरील या गुन्हेगारी कारवाईमुळे त्यांच्यात तीव्र नाराजी आणि संताप पसरला आहे.