मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक नवं वादळ उठलंय. प्रश्न हा आहे की, फक्त तोडण्याची भाषा करणाऱ्यांना राजकारणात स्थान आहे का? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गडकिल्ल्यांवरील 'नमो केंद्रा'वरून घेतलेल्या आक्रमक भूमिकेवर, शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आता थेट आणि धारदार टीका केलीय. पहिल्यांदाच शिंदेंनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय, आणि त्यांची ही टीका अत्यंत रोखठोक आहे.
राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर 'नमो केंद्रां'ची उभारणी करण्याची योजना आखलीय. पर्यटकांना माहिती आणि अत्यावश्यक सुविधा मिळाव्यात हा यामागचा उद्देश. पण याच केंद्रांना राज ठाकरे यांनी विरोध दर्शवला आणि ते केंद्र फोडून टाकण्याचा इशारा दिला. हा इशारा देताच खासदार श्रीकांत शिंदे यांनी बुलढाणा येथे राज ठाकरेंवर पलटवार केला.
शिंदे म्हणाले, 'राज ठाकरे नमो पर्यटन केंद्र फोडण्याचा इशारा देतात, कारण त्यांच्याकडून आजवर काहीही चांगले झालेले नाही.' त्यांचा थेट आरोप आहे की, "जे लोक काहीही निर्माण करू शकत नाहीत, तेच तोडफोडीची भाषा करणार. हे केंद्र केवळ पर्यटकांना माहिती देण्यासाठी आहेत, एवढी आगपाखड करण्याची गरज काय? महायुती सरकारने गडकिल्ले आणि मंदिरांच्या जीर्णोद्धाराचं मोठं काम केलंय. त्यामुळे नरेंद्र मोदींचं कौतुक करण्याऐवजी, ते फोडण्याची भाषा करतात. विशेष म्हणजे, कधीकाळी याच लोकांनी नरेंद्र मोदींचं कौतुक केलं होतं.
नवनिर्माण करणाऱ्यांना बाजूला सारून तोडफोडीची भाषा करणारे खरंच लोकांमध्ये स्थान मिळवतील का? केवळ विरोधासाठी विरोध करण्याची ही खेळी महाराष्ट्रातील सुजाण मतदार स्वीकारणार का? राजकारणाचा खरा रोख कोणता आहे, विकास की विध्वंस?