मुंबई : कोकणकरांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. कोकणात धावणाऱ्या आठ मेल एक्सप्रेस गाडयांना सिंधुदुर्ग आणि कणकवली या रेल्वे स्थानकांवर थांबा देण्याचा निर्णय रेल्वे मंडळाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाली असून सण उत्सवांच्या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाश्याना आता याचा पुरेपूर फायदा होणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील काही प्रमुख गाड्यांना निवडक स्थानकांवर थांबा होता. त्यामुळे बऱ्याच प्रवाश्यांची गैरसोय व्हायची. या पार्श्वभूमीवर कोकणातील प्रवासी आणि प्रवासी संघटनांनी सातत्याने लोकप्रतिनिधींमार्फत रेल्वे प्रशासनाकडे थांबे वाढवण्याची मागणी केली.
कोणत्या गाडयांना मिळणार थांबा ?
गाडी क्रमांक 12977/78 मरूसागर एक्सप्रेस आणि गाडी क्रमांक 22655/56 एर्नाकुलम–हजरत निजामुद्दीन–एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस या दोन्ही गाड्यांना सिंधुदुर्ग स्थानकात दोन मिनिटांचा थांबा दिला जाईल. तसेच गाडी क्रमांक 22475/76 हिसार–कोइम्बतूर–हिसार एसी सुपरफास्ट एक्सप्रेस आणि गाडी क्रमांक 16335/36 गांधीधाम–नागरकोईल–गांधीधाम एक्सप्रेस या गाड्यांना कणकवली स्थानकात थांबा दिला जाईल. या थांब्यांची अंमलबजावणी २ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबरदरम्यान टप्प्याटप्प्याने होईल. गाडी क्रमांक 12977 एर्नामुल जंक्शन-अजमेर एक्सप्रेसला सिंधुदुर्ग येथे २ नोव्हेंबरपासून, तर गाडी क्रमांक 12978 अजमेर - एर्नामुल जंक्शन एक्सप्रेस ला ७ नोव्हेंबरपासून सिंधुदुर्ग येथे थांबा देण्यात येईल. ही रेल्वे गाडी सिंधुदुर्ग स्थानकावर सकाळी 11.43 ला 5 मिनिटे थांबेल. गाडी क्रमांक 22655 ही 5 नोव्हेंबरपासून सकाळी 7.08 वाजता 2 मिनिटे थांबेल आणि 22656 ही 7 नोव्हेंबरपासून सिंधुदुर्ग येथे 7.20 ला येईल आणि २ मिनिटे थांबेल.
कणकवली स्थानकासाठी, गाडी क्रमांक 22475 ला 5 नोव्हेंबरपासून, 22473 ला 8 नोव्हेंबरपासून रात्री 9.43 ला थांबा दिला जाईल. 16335 ही 7 नोव्हेंबरपासून 9.48 ला कणकवलीत थांबेल आणि 16336 ही 11 नोव्हेंबरपासून सकाळी 6.30 वाजता कणकवलीत २ मिनिटे थांबेल. नंतर ही गाडी 6.32 ला पुढील प्रवासासाठी रवाना होईल. प्रवाशांनी रेल्वेगाडीचे आरक्षण करताना सुधारित थांबे तपासावेत, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.