मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असताना, काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करत एक मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेस नेते आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांनी जाहीरपणे सांगितले की, आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे यांच्या कोणत्याही गटासोबत युती करणार नाही.
भाई जगताप म्हणाले की, “मी मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष असताना स्पष्टपणे सांगितले होते की आपण शिवसेना (ठाकरे गट) किंवा मनसेसोबत महापालिका निवडणुकीत एकत्र जाणार नाही. हीच भूमिका मी काँग्रेसच्या राजकीय कामकाज समितीच्या बैठकीत रमेश चेन्नीथला यांच्या समोरही मांडली होती.”
त्यांनी हेही अधोरेखित केले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात, केवळ नेत्यांच्या नाहीत. अनेक वर्षांपासून निष्ठेने पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी, हीच आमची भूमिका आहे. “मुंबईतील कार्यकर्त्यांची इच्छा आहे की, काँग्रेसने या निवडणुकीत स्वबळावर लढावे. त्यामुळे निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक कार्यकर्त्यांना दिला पाहिजे,” असेही ते म्हणाले.
भाई जगताप यांनी स्पष्ट केले की काँग्रेसने कधीही राज ठाकरे यांच्यासोबत युती करण्याचा विचारही केलेला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटासोबत देखील युती होण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
या पार्श्वभूमीवर काँग्रेस मिडिया सेलचे प्रमुख सचिन सावंत यांनी सांगितले की, “राजकीय कामकाज समितीच्या बैठकीत प्रत्येक नेत्याचे मत ऐकले गेले असून, अंतिम निर्णय काँग्रेस सर्व संबंधितांशी चर्चा करून घेईल.”
या वक्तव्यांमुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीतील काँग्रेसची दिशा आणि धोरण स्पष्ट झाली असून, स्थानिक पातळीवरील घडामोडींवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.