दरवर्षी नोबेल पुरस्कार जाहीर होतात तेव्हा शांततेच्या बरोबरच अर्थशास्त्राच्या नोबेलची सर्वत्र मोठी उत्सुकता व चर्चा होते. २०२५ या वर्षाचा अर्थशास्त्रासाठीचा पुरस्कार जोएल मोकीर, फिलीप आगियॉन व पीटर हॉविट या तिघांच्या ‘आर्थिक वाढीच्या नवसिद्धांताच्या’ संशोधनाला जाहीर झाला आहे. भारताच्या दृष्टीने या संशोधनाचे महत्त्व विशद करण्याचा हा प्रयत्न.
प्रा. नंदकुमार काकिर्डे
स्टॉकहोम येथील ‘द रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेस’ यांच्या वतीने १९६८ पासून स्वीडिश उद्योजक व रसायन शास्त्रज्ञ आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ वैद्यकशास्त्र, व भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य व शांतता याबरोबरच अर्थशास्त्र या क्षेत्रांसाठीचे नोबेल पुरस्कार दिले जातात. २०२५ या वर्षाचा अर्थशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार जोएल मोकीर, फिलिप आगियॉन व पीटर हॉवीट यांना संयुक्तरीत्या जाहीर झाला आहे. यातील अर्धे पारितोषिक मोकेर यांना "तांत्रिक प्रगतीद्वारे शाश्वत विकासाच्या" विश्लेषणासाठी देण्यात आले असून उर्वरित अर्धे पारितोषिक दिलीप आगियॉन व पीटर हॉवीट यांना सर्जनशील विध्वंसातून (क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन) शाश्वत विकासाचा सिद्धांत मांडल्याबद्दल संयुक्तपणे देण्यात आले आहे.
गेल्या वर्षी म्हणजे २०२४ मध्ये अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक डेरॉन एसमोग्लू, सिमॉन जॉन्सन व जेम्स ए रॉबिन्सन या तीन अर्थतज्ज्ञांना देण्यात आले होते. जगातील काही देश श्रीमंत तर इतर देश गरीब का होतात याचा अभ्यास या तिघांनी केला होता. तसेच स्वतंत्र आणि मुक्त समाज समृद्ध होण्याची शक्यता अधिक असल्याचा निष्कर्ष त्यांच्या संशोधनातून काढण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या नोबेल पारितोषिक विजेत्यांच्या संशोधनाचे महत्त्व भारतासारख्या विकसनशील देशाच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वाचे आहे हे यानिमित्ताने पाहणे अभ्यासाचे ठरते.
या तीन अर्थशास्त्रज्ञांची ओळख करून घ्यायची झाली तर मोकीर यांचा जन्म नेदरलँडमध्ये १९४६ मध्ये झाला. येल विद्यापीठातून त्यांनी पीएचडी केली असून सध्या ते अमेरिकेतील नॉर्थ वेस्टर्न विद्यापीठातील संशोधक प्राध्यापक आहेत. ऑगियान यांचा जन्म पॅरिसमध्ये झालेला असून त्यांनी हॉर्वर्ड विद्यापीठ, केंब्रिज येथून पीएचडी केलेली आहे. सध्या ते कॉलेज दि फ्रान्स व लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, इंग्लंड येथे संशोधक प्राध्यापक आहेत. तर हॉवीट यांचा जन्म कॅनडामध्ये झाला असून नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातून त्यांनी पीएचडी केली आहे. सध्या ते ब्राऊन विद्यापीठात संशोधक प्राध्यापक आहेत.
श्री मोकीर यांनी त्यांच्या संशोधनाद्वारे जगभरातील नवीन शोध स्वयंप्रेरक प्रक्रियेद्वारे सातत्याने यशस्वी होत गेले तर आपल्याला केवळ काहीतरी संशोधन काम करीत आहे हे जाणून घेण्याचीच नव्हे तर ते संशोधन का होते याचे शास्त्रीय स्पष्टीकरण शोधण्याची गरज असते असा सिद्धांत मांडलेला आहे. तांत्रिक प्रगती द्वारे शाश्वत विकासासाठी आवश्यक असलेल्या पूर्व आवश्यकता ओळखण्याचे महत्त्वाचे संशोधन त्यांनी केले आहे. त्याचप्रमाणे या तिघांच्या संशोधनातून प्रत्येक देशाचे ज्ञान आर्थिक वाढीला कसे सामर्थ्य देते व सर्जनशील विनाशाद्वारे अर्थव्यवस्था स्वतःला कसे नूतनीकरण करतात असेही त्यांनी प्रतिपादन केलेले आहे. या तिघांचे संशोधन ॲडम स्मिथ पासून अगदी भारताच्या अमर्त्य सेन यांच्यापर्यंतच्या अर्थ विचारवंतांना गोंधळात टाकणाऱ्या एका जुन्या प्रश्नाचे उत्तर देते. जगातील काही देश देशांचा आर्थिक विकास का होतो तर काही देश स्थिर का राहतात याचेही उत्तर त्यांच्या संशोधनातून मिळते. एवढेच नाही तर विकासाच्या शिडीवर चढण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या भारतालाही अर्थव्यवस्था वेळेवर शिकवण देत असते असा त्यांच्या संशोधनाचा गाभा आहे.
जगभरातील अर्थशास्त्रज्ञांनी गेली अनेक शतके आर्थिक विकास कशाला चालना देतो या प्रश्नावर सातत्याने वादविवाद केलेले आहेत. काही अर्थतज्ज्ञांनी जगाच्या भूगोलाकडे सगळ्यांचे लक्ष वेधले होते. उष्ण कटिबंधीय हवामानामुळे रोगराई, आळस आणि खराब माती निर्माण होत राहते असा काहींचा दावा होता तर इतरांनी नैसर्गिक संसाधनावर भर दिलेला होता. वर उल्लेख केल्यानुसार गेल्या वर्षीच्या नोबेल पुरस्काराने डेरॉन एसमोग्लू, सिमॉन जॉन्सन व जेम्स ए रॉबिन्सन यांना समृद्धी कशी मजबूत करता येते व समावेशक संस्थांना कसा आधार देते हे दाखवल्याबद्दल सन्मानित केले होते. मात्र या तिघांपैकी एकाचाही सिद्धांत पूर्णपणे समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकलेला नव्हता. भूगोल हा गतिमानतेचे नाही तर प्रत्येक स्थानाचे स्पष्टीकरण देतो. प्रत्येक देशातील संस्था निश्चित महत्त्वाच्या असतात; परंतु या संस्था कधीही स्वतःच्या कल्पना निर्माण करत नाहीत. या पार्श्वभूमीवर यावर्षीचा नोबेल पुरस्कार एक नवीन महत्त्वाची संकल्पना मांडत असून कोणत्याही देशात नवनवीन उपक्रम टिकवून ठेवणारा सांस्कृतिक आणि धोरणात्मक पाया हा देशाच्या आर्थिक विकासाला मोठे बळ देतो असा त्यांचा निष्कर्ष आहे. यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा एखादा समाज कुतूहल व ज्ञानाला जास्त महत्त्व देतात तेव्हा त्यांची भरभराट वेगाने होते. आगियॉन व हॉवीट यांचे संशोधन असे स्पष्ट करते की समाजातील कल्पना सातत्याने स्पर्धा व नूतनीकरणाद्वारे उत्पादकता वाढण्यासाठी उपयुक्त ठरतात. एखाद्या देशाची आर्थिक प्रगती का होते हे देखील या संशोधनातून जास्त प्रकर्षाने स्पष्ट करण्यात आले आहे.
स्थिरतेच्या नावाखाली सत्ताधाऱ्यांना चिकटून राहणाऱ्या अर्थव्यवस्था बऱ्याचदा स्थिर राहतात. मात्र नूतनीकरणातून या अर्थव्यवस्थेची वाढ होत राहते. २१व्या शतकात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थव्यवस्थेच्या प्रगतीवर वेगळा परिणाम घडवणारी आहे. एक प्रकारे माणसाच्या सर्जनशील विनाशाची परीक्षा घेतली जात आहे. एका बाजूला कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे उत्पादकता वाढीचे मोठे आश्वासन जगाला मिळत असले तरी त्यामध्ये लक्षणीय उलथापालथ होण्याची चिन्हे या संशोधकांनी अधोरेखित केलेली आहे. त्यांच्या मते नवीन उद्योग उदयाला येत असताना संपूर्ण उद्योगावर मंदीची छाया पसरू शकते. कोणत्याही अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचे व्यवस्थापन करण्यासाठी मंथन व करुणा या दोन्हीची आवश्यकता आहे. जो समाज बदलाला विरोध करतो किंवा त्याचे फायदे सामायिक करण्यात अयशस्वी होतो त्यांना मोठ्या संघर्ष करावा लागेल व जे देश नवीन नवीन उपक्रम स्वीकारतात व त्याचवेळी त्याच व्यत्यय आणणाऱ्यांना पाठिंबा देतात त्या देशाची अर्थव्यवस्था निश्चित प्रगती करेल असा आशावाद या नोबेल विजेत्या अर्थतज्ञांनी सौदाहरण स्पष्ट केला आहे. त्यांच्या मते कोणत्याही देशाची आर्थिक वाढ ही अपरिहार्य नाही. संशोधन व विकास,स्पर्धा व सामाजिक सुरक्षा जाळ्यांचे संरक्षण करणारी धोरणे त्यासाठी आवश्यक आहेत. जीडीपीच्या वाढीवर लक्ष केंद्रित करीत असताना हवामान आणि सामाजिक खर्चाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सर्जनशील विनाश, असमानता व संसाधनाचे चुकीचे वाटप वाढवू शकते असा इशाराही त्यांनी संशोधनातून दिला आहे.
भारताची अर्थव्यवस्था गतिमान होण्यासाठी आवश्यक असणारे घटक निश्चित उपलब्ध आहेत. त्यामध्ये तरुण कर्मचारी वर्ग, वाढती डिजिटल अर्थव्यवस्था व उद्योग क्षेत्रात जाणवत असलेली ऊर्जा यांच्यामुळे अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. मात्र त्याचवेळी अंशिक आधुनिकतेत अडकण्याचा धोका आपल्या देशासमोर उभा आहे. भारताने आर्थिक विकास टिकून ठेवण्यासाठी केवळ अधिक उत्पादन करू नये तर चांगले विचार करावेत, सार्वजनिक जीवनात कुतूहलाची संस्कृती निर्माण करावी, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून देशासमोरील समस्या सोडवण्याचे योग्य शिक्षण द्यावे व केवळ चाचण्या न घेता प्रत्यक्षात उत्पादन क्षेत्राला हातभार लावला पाहिजे. एवढेच नाही तर देशातील प्रशासनाने म्हणजे नोकरशाहीने या प्रयोगांना अराजकता म्हणून नव्हे तर अर्थव्यवस्थेतील नवीन शोध म्हणून पाहिले पाहिजे. भारताने जागतिक पातळीवरील स्पर्धा योग्य मानसिकतेतून स्वीकारण्याची आवश्यकता आहे.अनेक वेळा धोरण स्थिरतेच्या नावाखाली सार्वजनिक किंवा खाजगी क्षेत्रातील लोकांना प्रशासन आश्रय देते. जुन्याचे संरक्षण करत असताना नवीन प्रयोगाचा जीव गुदमरणे योग्य नाही. बाजारपेठ प्रवेश व अन उत्पादक कंपन्यांना बाहेर पडून देण्याचे धाडस हे खरे प्रगतीचे इंजिन आहे.भारताने आपल्या लोकांना सर्व प्रकारच्या बदलासाठी सुसज्ज केले पाहिजे. सर्जनशील विनाश हा विघटनकारी आहे. मानवीय प्रतिसाद नवीन उपक्रम रोखण्यासाठी नाही तर सर्व लोकांना परिस्थितीशी जुळवून घेण्यास मदत करण्यासाठी आहे.आयुष्यभर शिक्षण, पुर्न शिक्षण आणि सुरक्षा जाळे विस्थापनाला संधीमध्ये बदलू शकतात. भारताने खऱ्या अर्थाने मोठ्या शहरांच्या पलीकडे जाऊन नवीन उपक्रमांचा विस्तार केला पाहिजे. लहान शहरांमध्ये तसेच स्थानिक उद्योगांमध्ये व राज्य विद्यापीठांमध्ये उच्च दर्जाचे संशोधन करण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे. तसेच कुतूहलाला जास्त संधी दिली पाहिजे आणि असे झाले तरच भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये वाढीची संस्कृती फुलत राहील. जागतिक पातळीवर सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था बनण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या भारतासाठी हे आवश्यक व्यावहारिक पाऊल आहे असा संदेश या नोबेल पारितोषिक विजेत्या अर्थतज्ज्ञांनी आपल्याला दिला आहे. देशाच्या नेतृत्वाने त्या दृष्टिकोनातून आपली पुढची वाटचाल करण्याची आवश्यकता आहे हाच संदेश या नोबेल पारितोषिकाने भारताला दिलेला आहे असे वाटते. त्यासाठी तिसरी अर्थव्यवस्था बनण्याकडे वाटचाल करण्यासाठी मनापासून शुभेच्छा.