मुंबई : महाराष्ट्रात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट निवडणूक आयोगावर बोट ठेवत एक धक्कादायक दावा केला आहे. "१ जुलै रोजी निवडणूक आयोगाने मतदार यादी गोठवली असताना त्यानंतर राज्यात तब्बल ९६ लाख बोगस मतदारांची भर घातली गेली आहे," असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
राज ठाकरे यांच्या या आरोपावर आता ग्रामविकास मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मजेशीर प्रत्यत्तर दिले आहे. "ज्यांनी आयुष्यात प्रथमच मतदार याद्या पाहिल्या असाव्यात, त्यांना मतदार बोगस आहे की खरे कसे कळणार?" असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
त्याचप्रमाणे, "पूर्वी ईव्हीएमवर शंका घेतली, आता मतदार यादीवर संशय घेत आहेत. पराभव निश्चित असल्याची जाणीव झाल्यावर अशी कारणं शोधली जात आहेत," अशी खोचक प्रतिक्रिया देत गोरे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.
तसेच संजय राऊत यांनी मोर्चा काढण्याची दिलेली धमकीही गोरे यांनी फेटाळली. "त्यांच्या हातात आता काहीच राहिले नाही. लोकांचं पाठबळही संपलं आहे. त्यामुळे निवडणुकांपासून पळण्याचे हे नवे मार्ग आहेत," असे गोरे म्हणाले.