पुणे : शनिवार वाड्यात नमाज पठण झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून पुणे शहरात राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे हिंदुत्ववादी संघटना, पतित पावन संघटना आणि भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत. शनिवार वाड्याच्या परिसरात आंदोलन करण्यात आलं. परिसरात गोमूत्र शिंपडून 'शुद्धीकरण' करत 'शिववंदना' करण्यात आली.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. याआधी त्यांनीच शनिवार वाड्यातील नमाज पठणाचा व्हिडीओ एक्स पोस्ट केला आणि यापुढे अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत असा इशारा दिला. त्या म्हणाल्या, "शनिवार वाडा हे केवळ ऐतिहासिक स्थळ नाही, तर मराठ्यांच्या पराक्रमाचे प्रतीक आहे. येथे नमाज पठण करणे दुर्दैवी असून, अशा कृतींना आमचा तीव्र विरोध आहे."
पुणे : पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर एक ...
सदर प्रकारानंतर पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवार वाड्याच्या परिसरात आंदोलन केले. शनिवार वाड्यात गोमूत्र शिंपडले आणि शुद्धीकरण करून या ठिकाणी 'शिववंदना' केली. तसेच, पूर्वी येथे साजरा होणारा माघी गणेश उत्सव पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. आंदोलकांनी परिसरात असलेल्या एका मजारवर आक्षेप घेत भगवा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या ठिकाणी भगवा झेंडा फडकवू न दिल्याने आंदोलकांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच या ठिकाणी असलेली मजार अनधिकृत असल्याचे सांगत ती लवकरात लवकर हटवावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
पोलीस आणि आंदोलकांमध्ये काही काळ वाद झाला. आंदोलक म्हणाले की, "इथे हिरवा झेंडा फडकावला जातो तेव्हा पोलिस कुठे असतात ? ज्या वेळी येथे नमाज पठाण झाले तेव्हा पोलीस कुठे होते ? आम्ही भगवा झेंडा फडकवू इच्छितो तेव्हा अडथळे का आणले जात आहे ?" अखेरीस आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाने त्यांना झेंडा फडकवण्याची परवानगी दिली.
सदर प्रकरणानंतर पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असलेल्या या ठिकाणी कोणत्याही धार्मिक कृतींना परवानगी असावी का, यावर चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास करून पुढील कारवाईचे संकेत दिले आहेत.