मुंबई : मुंबईतील घाटकोपर पश्चिम भागात असलेल्या गोल्डक्रेस्ट बिझनेस पार्क या नामांकित व्यावसायिक इमारतीत आज मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. दुपारी २:३५ च्या सुमारास ही आग लागली. तळमजल्यापासून सुरू झालेली ही आग काही क्षणांतच वरच्या मजल्यांपर्यंत पसरली असून, घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहे.
अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू असून, काही जण अजूनही इमारतीत अडकलेले असल्याचे समजते. त्यामुळे बचावकार्य अधिक आव्हानात्मक बनले आहे. अनेक मजल्यांवर अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी शिड्या लावून त्यांना सुरक्षितरित्या खाली आणले जात आहे.
फायर अलार्म वाजल्यानंतर इमारतीतील बऱ्याच कर्मचाऱ्यांनी वेळीच बाहेर पडून जीव वाचवला. काही लोकांना अग्निशमन दलाने आतून सुरक्षित बाहेर काढले आहे. मात्र अजूनही काहीजण इमारतीत अडकले असून, त्यांना श्वास घेण्यास अडचण येत आहे.
गोल्डक्रेस्ट बिझनेस पार्क ही एक पूर्णपणे व्यावसायिक इमारत असून, यामध्ये विविध कंपन्यांची कार्यालयं आहेत. सध्या कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही, मात्र अडकलेल्या लोकांची प्रकृती चिंताजनक होऊ नये म्हणून आग लवकरात लवकर आटोक्यात आणणं आणि सर्वांना सुरक्षित बाहेर काढणं आव्हानात्मक बनलं आहे.