Sunday, November 9, 2025

देवनार डम्पिंग ग्राऊंडवरील जैव खाणकामासाठी नवयुग इंजिनिअरींगची निवड

देवनार डम्पिंग ग्राऊंडवरील जैव खाणकामासाठी नवयुग इंजिनिअरींगची निवड

बायोमायनिंग प्रकल्पासाठी तब्बल ३०३५ कोटी रुपये होणार खर्च

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्यावतीने देवनार डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याची विल्हेवाट लावून जमिन पुनर्प्राप्त करण्यासाठी जैव खाणकाम अर्थात बायोमायनिंग प्रकल्प हाती घेण्याचा निर्णय घेतला असून या प्रकल्प कामासाठी अखेर नवयुगा इंजिनिअरींग कंपनी लिमिटेड कंपनीची निवड केली आहे. या कामांसाठी नवयुगा ही कंपनी पात्र ठरल्यानंतर या कंपनीसोबत वाटाघाटीनंतर साडेचार टक्के दर कमी करण्यास तयारी दर्शवल्यानंतर या कंपनीला काम देण्याच्या प्रस्तावाला प्रशासकांची मंजुरी प्राप्त झाल्याची माहिती मिळत आहे . देवनार डम्पिंग ग्राऊंड हे मुंबई महानगरपालिकेचे सर्वात मोठे डम्पिंग ग्राऊंड असून, ही सुमारे १२० हेक्टर इतक्या क्षेत्रफळात पसरलेले आहे. सन १९२७ पासून याठिकाणी कचरा टाकण्यात येत आहे. या डम्पिंग ग्राऊंडवर आतापर्यंत सन २०२५ पर्यंत अंदाजे १८५ लाख टन इतका घनकचरा जमा झालेला आहे. त्यामुळे कचऱ्याच्या ढीगांची उंची ८ मी. पासून ४० मी. पर्यंत पोहोचलेली आहे. सद्यस्थितीत मुंबईमध्ये दैनंदिन निर्माण होणाऱ्या सुमारे ६६०० मेट्रीक टन कचऱ्याच्या तुलनेत ९० टक्के म्हणजेच सुमारे ५९०० मेट्रीक टन पैकी सुमारे ५००० मेट्रीक टन कचऱ्यावर कांजूर येथील प्रक्रिया प्रकल्पात बायोरिक्टर तंत्रज्ञान व सुमारे १००० मेट्रीक टन कचऱ्यावर कंपोस्ट तंत्रज्ञान वापरून कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केली जाते. उर्वरित १० टक्के आजही देवनार क्षेपणभूमीवर सरासरी ५०० ते ६०० मेट्रीक टन प्रति दिन इतका कचरा स्विकारण्यात येत आहे. या डम्पिंग ग्राऊंडची जागा राज्य शासनाकडून महापालिकेला प्राप्त झाल्याने ही जागा पुन्हा सरकारला होती तशी परत मिळावी अशाप्रकारचे निर्देश दिल्यामुळे येथील कचऱ्याची विल्हेवाट लावून बायोमायनिंग प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पासाठी महापालिकेच्यावतीने निविदा मागवण्यात आली होती. यासाठी विविध करांसह ३०३५.५४ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. यासाठी नवयुगा इंजिनिअरींग लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कंपनीने अंदाजित दरापेक्षा ७.२६ टक्के अधिक दराने बोली लावली होती, त्यानंतर या कंपनीशी वाटाघाटी केल्यानंतर त्यांनी ४.६६ टक्के एवढ्या दरात काम करण्याची तयारी दर्शवली होती, परंतु प्रशासनाच्यावतीने पुन्हा एकदा वाटाघाटी केल्यानंतर त्यांनी अंदाजित दरापेक्षा ३.०२ टक्के अधिक दरात काम करण्याची तयारी दर्शवली आहे. देवनार डम्पिंगची २३५ एकर जमिन ही कचरा डेपोसाठी मुंबई महानगरपालिकेला देण्यात आली होती), त्यातील ८० एकर जमीन कायमस्वरूपी जिथे आता वीज निर्मिती प्रकल्प आणि इतर आगामी प्रकल्प राबवले जात आहे, त्यासाठी ७५ एकर तसेच रफिक नगर स्मशानभूमी आणि लगतच्या झोपडप‌ट्टीसाठी ५ एकर जमिनीचा समावेश आहे. मात्र, देवनार डम्पिंग ग्राऊंड येथील दररोज येणारा कचरा घेण्यासाठी आवश्यक असलेली तात्पुरती ५० एकर जमीन वीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वित होईपर्यंत महाालिकेकडे राखून ठेवला जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केेले आहे.
Comments
Add Comment