ठाणे (प्रतिनिधी) : यंदा पावसाळी मासेमारीबंदी संपुष्टात आल्यानंतर १ ऑगस्टपासून सुरू झालेल्या मासेमारीच्या नव्या हंगामाला अतिवृष्टी, वादळी वारे यांचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच पारंपरिक मच्छिमारांना अनपेक्षित नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागल्याने ऑगस्ट-सप्टेंबर हे मासेमारीकरिता पोषक असूनही खराब हवामानामुळे या दोन महिन्यांत मच्छिमारांना पूर्ण क्षमतेने मासेमारी करता आली नाही. यामुळे, ठाणे, नवी मुंबईसह रायगड जिल्ह्यातील कोळी बांधवांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
यावर्षी, नारळी पौर्णिमेनंतर अचानक वादळी हवामान आणि अतिवृष्टी सुरू झाली. त्यामुळे मासेमारीत काही दिवसांचा खोळंबा झाला. त्यानंतर मासेमारी सुरू झाली. पुन्हा गौरी-गणपतीच्या काळात खराब हवामानामुळे मासेमारी खोळंबली. नवरात्रोत्सव सुरू होताच पुन्हा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने अतिवृष्टी व वादळी हवामानामुळे मासेमारी खोळंबली. यामुळे, नवी मुंबईतील स्थानिक कोळी बांधवांना याचा फटका बसला आहे. मत्स्य व्यवसायचा शेतीचा दर्जा मिळाला असल्याने अतिवृष्टी, लहरी हवामानामुळे घरी बसावे लागलेल्या मच्छीमारांना शासनाने आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत यांनी केली आहे.
ऑगस्ट-सप्टेंबर हे मासेमारीकरिता पोषक महिने असूनही खराब हवामान, वादळ आणि अतिवृष्टी यामुळे या दोन महिन्यांत पारंपरिक मच्छिमारांना पूर्ण क्षमतेने मासेमारी करता आली नाही. आगरी-कोळी समाजातील मच्छिमारांना मासेमारी करण्यास न जमल्याने मोठा आर्थिक फटका बसला असल्याचे नामदेव भगत यांनी यावेळी सांगितले.