'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'


मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे, हे लक्षात घेऊन राज्यातील सर्व संवर्गातील पदांच्या सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्यात येणार आहे, असे सांगून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पदभरती प्रक्रिया गतीशील करून २०२६ या वर्षात मोठ्या प्रमाणात पदभरती करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केले. शासकीय सेवेत आज नियुक्त झालेल्या सर्व उमेदवारांनी लोकाभिमुख आणि पारदर्शी पद्धतीने आपले काम करावे, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सामान्य प्रशासन विभागातर्फे अनुकंपा तत्वावरील व लिपिक श्रेणीतील १० हजार ३०९ उमेदवारांना नियुक्तीपत्र वितरणाच्या राज्य रोजगार मेळाव्याच्या राज्यस्तरीय कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.


राज्य शासनाची संस्थात्मक बांधणी बळकट करणार


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्य शासन अधिक सक्षम आणि गतिशील करण्यासाठी शासनाने सेवा प्रवेश नियमांमध्ये सुधारणा, अनुकंपा तत्त्वावरील प्रलंबित प्रकरणांचे निराकरण तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पारदर्शक भरती प्रक्रिया राबविण्यावर भर दिला आहे. आयोगाची पदभरती प्रक्रिया गतीशील करण्यासाठी अपर मुख्य सचिव सामान्य प्रशासन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून विविध राज्यांचा अभ्यास करून निर्णय घेणार आहोत. आतापर्यंत ८० टक्के अनुकंपा नियुक्त्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित प्रकरणे लवकरच निकाली काढण्यात येतील. राज्याचे प्रशासन हे संस्थात्मकदृष्ट्या बळकट करण्याबरोबरच ते गतिशील, संवेदनशील आणि लोकाभिमुख करण्यास प्राधान्य दिले असून यासाठी १०० दिवसांचा आणि नंतर १५० दिवसांचा कार्यक्रम घेतला. यातून अनेक सुधारणा करता आल्या. अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी सामान्य प्रशासन विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर मोठे बदल सुरू केले, असेही मुख्यमंत्री म्हणाले.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अनुकंपा तत्वावर नोकरी देणे हे काही उपकार नाहीत, तर ती शासनाची जबाबदारी आहे. कर्मचाऱ्यांच्या घरी एखादा अपघात झाल्यास, त्यांच्या कुटुंबाची काळजी घेणे हे सरकारचे कर्तव्य आहे, या भावनेतून आम्ही काम केले. याच बदलांमुळे आज ८०% अनुकंपाच्या जागा भरल्या गेल्या आहेत, आणि उर्वरित २०% जागाही लवकरच भरल्या जातील असेही ते म्हणाले.


अनुकंपा यादीत शहीद उपनिरीक्षक प्रकाश पांडुरंग मोरे यांची कन्या अनुष्का प्रकाश मोरे हिला नियुक्ती दिली आहे. अनुष्काला न्याय मिळवून दिल्याचा आम्हाला आनंद आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. लिपिक संवर्गातील नियुक्त्याही एमपीएससीमार्फत करण्याचा निर्णय घेतला आहे. एखाद्या राज्यामध्ये जर भरती प्रक्रियेत पारदर्शकता नसेल, तर मेहनत करणाऱ्यांवर मोठा अन्याय होतो. म्हणूनच, आयबीपीएस आणि टीसीएससारख्या चांगल्या संस्थांमार्फत परीक्षा घेऊन जवळपास १ लाख लोकांना नियुक्त्या दिल्या आहेत, ज्यात ४० हजार पोलिसांची भरतीही समाविष्ट आहे. पुढील काळात सेवा प्रवेश नियमांमध्ये सुधारणा करून आणि भरती प्रक्रियेची गती वाढवून नियुक्त्या दिल्या जातील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.


शासकीय सेवेत आल्यानंतर तुम्ही लोकाभिमुखतेने आणि पारदर्शी पद्धतीने कारभार कराल. शासन आणि प्रशासन हे जनतेला सेवा देण्यासाठी निर्माण झाले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार जनता मालक आहे, आणि आपण सर्वजण त्यांची सेवा करण्यासाठी नियुक्त केलेली व्यवस्था आहोत. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाशी सेवेकरी म्हणून संवाद साधा असे आवाहन करून आपल्या कामातून तुमच्याकडे येणाऱ्या किमान १०% लोकांच्या चेहऱ्यावर तुम्ही हास्य फुलवू शकलात, तर त्यापेक्षा मोठे समाधान जीवनात दुसरे काही नसते. आपण सेवा करण्याकरता येथे आलेलो आहोत. हा सेवाभाव तुम्ही कायम ठेवल्यास, सरकारी सेवेत काम करताना मिळणारे मानसिक समाधान कोणत्याही पैशाशी तुलना न करता येणारे समाधान असेल असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.


पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रत्येक जिल्ह्यात नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले. राज्य शासनात नियुक्त होणाऱ्या एकूण १०,३०९ उमेदवारांपैकी सर्वाधिक ३,०७८ उमेदवार हे कोकण विभागातील असून २,५९७ हे विदर्भातील आहेत. पुणे विभागात १,६७४, नाशिक विभागात १,२५०, तर मराठवाड्यातील १,७१० उमेदवार आहेत.


Comments
Add Comment

डिजिटल व्यवसाय आणि उद्योजकता

करिअर : सुरेश वांदिले डिजिटल व्यवसाय आणि उद्योजकता विषयातील बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (बीबीए-डीबीइ) हा

Bihar Vidhan Sabha Election Result : बिहार विधानसभा मतमोजणीला लवकरच सुरुवात; नवे सरकार आज स्थापन होण्याच्या दिशेने पहिले पाऊल...

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान नुकतेच पार पडले असून, आज, निकालाचा 'महादिवस' आहे. आज या निवडणुकीचे

एक कोटी लाडक्या बहिणींकडून केवायसी पूर्ण

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत

महिलांच्या वाढलेल्या विक्रमी मतदानामुळे एनडीएचे पारडे जड?

निवडणुकीची आज मतमोजणी व निकाल मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून बिहार विधानसभा निवडणुकीची देशभरात चर्चा होती. ही

मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांसह जवानांना पूरपरिस्थितीत बचावाचे प्रशिक्षण, ऍडवॉन्स फ्लड आणि रेस्क्यू प्रशिक्षणाकरता नेमली संस्था

पाण्यात आणि उंचावर अडकलेल्यांना अत्याधुनिक पध्दतीने वाचवण्यासाठी करणार प्रशिक्षित मुंबई (खास प्रतिनिधी):

पवई तलावातील जलपर्णी वाढता वाढता वाढे, कंत्राटदाराला मिळाला १ कोटी रुपयांचा बोनस

मुंबई (सचिन धानजी): मुंबईतील पवई तलावातील पाण्याच्या पृष्ठभागावरील जलपर्णी वनस्पती, तरंगणा-या तसेच जमिनीतून