गडचिरोली : मराठवाड्याला अतिवृष्टीचा फटका बसलेला असतानाच विदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यालाही पुराचा जबर फटका बसला आहे. यंदाच्या वर्षी भामरागड तालुक्याला पाचव्यांदा पुराचा फटका बसला आहे. यावेळी भामरागड तालुक्यातील १०५ गावांचा संपर्क तुटला आहे. आलापल्ली-भामरागड राष्ट्रीय महामार्ग (NH-130D) पाण्याखाली गेला आहे. या मार्गावरील वाहतूक बंद आहे.
पुराचा तडाखा बसलेल्या मराठवाड्याला राज्य शासनाने २२१५ कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर केली आहे. ही मदत शेतकऱ्यांना डोळ्यापुढे ठेवून जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे विदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यालाही पुराचा तडाखा बसला आहे. यंदाच्या वर्षी भामरागड तालुक्याला पाचव्यांदा पुराचा फटका बसला आहे. भामरागड तालुक्यातील १०५ गावांचा संपर्क तुटला आहे. आलापल्ली-भामरागड राष्ट्रीय महामार्ग (NH-130D) पाण्याखाली गेल्यामुळे या रस्त्यावरुन होणारी वाहतूक अनिश्चित काळासाठी ठप्प आहे.
पर्लकोटा नदी दुथडी भरून वाहू लागली आणि रात्री उशिरा राष्ट्रीय महामार्गावरील पुलावर पाणी चढले. यामुळे, आल्लापल्ली–भामरागड महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. महसूल व पोलीस विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून बॅरिकेटस लावून बंदोबस्त ठेवला आहे. वाहतूक ठप्प झाल्याने एसटी महामंडळाच्या बसगाड्या तसेच खासगी वाहने पुलाच्या दोन्ही बाजूला अडकून पडली आहेत. नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रुग्ण, विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार यांची गैरसोय झाली आहे.