मुंबई : भविष्यात राज्यातील सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत सुमारे ८,००० नवीन बसेस सुरू करण्याच्या योजना असल्याने मनुष्यबळाची मोठी गरज निर्माण झाली आहे. यासाठी एसटी महामंडळात कंत्राटी पद्धतीने १७,४५० चालक व सहाय्यक पदांसाठी भरती (ST Recruitment) राबविण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिली. याच भरती प्रक्रियेच्या माध्यमातून राज्यातील हजारो बेरोजगार युवक-युवतींना रोजगार उपलब्ध होणार आहे, ज्यामध्ये किमान वेतन ३०,००० रुपये असण्याची शक्यता आहे. भरतीसाठीची निविदा प्रक्रिया २ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. प्रताप सरनाईक यांनी आवाहन केले की, “ही सुवर्णसंधी आहे आणि या संधीचा पुरेपूर फायदा होतकरू तरुण-तरुणींनी घ्यावा.” राज्यातील बेरोजगारांसाठी ही भरती महत्त्वाची संधी ठरणार आहे, कारण त्यामुळे स्थिर आणि दर्जेदार रोजगार मिळण्याची संधी प्राप्त होणार आहे.
ST महामंडळात चालक व सहाय्यक भरती; ३ वर्षांसाठी कंत्राटी पद्धत
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ३०० व्या संचालक मंडळ बैठकीत बससेवा सुरळीत चालू राहण्यासाठी आवश्यक चालक व सहाय्यक मनुष्यबळ भाडेतत्त्वावर (कंत्राटी पद्धतीने) ३ वर्षांसाठी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असून, ही प्रक्रिया सहा प्रादेशिक विभागानिहाय आयोजित केली जाईल. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मनुष्यबळ पुरविणाऱ्या संस्थांकडून आवश्यक कर्मचारी वेळेत महामंडळाला उपलब्ध होईल. कंत्राटी पद्धतीने भरती होणाऱ्या उमेदवारांना सुमारे ३०,०००/- रुपये मासिक वेतन देण्यात येईल, तसेच एसटीकडून प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत सांगितले की, बसेसची वाढती संख्या लक्षात घेता, हे मनुष्यबळ मिळाल्यानंतर प्रवाशांना अखंडित, सुरक्षित आणि दर्जेदार बससेवा पुरविणे शक्य होईल. ही भरती राज्यातील बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगाराची मोठी संधी ठरणार आहे.
राज्य पोलीस भरतीला मंत्रिमंडळाची मंजुरी
काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने राज्य पोलीस दलातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पोलीस भरतीला अधिकृत मंजुरी देण्यात आली होती. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून भरती प्रक्रिया लांबलेली असल्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले होते. आता मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर या भरती प्रक्रियेला वेग मिळणार आहे. या निर्णयामुळे दीर्घकाळ पोलीस भरतीकडे नजर ठेवून बसलेल्या अनेक तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. उमेदवार आता अपेक्षित वेगानं अर्ज प्रक्रिया आणि निवड प्रक्रियेची वाट पाहू शकतील. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पोलीस दलातील रिक्त पदे लवकरच भरली जातील, तसेच युवक-युवतींना स्थिर रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.