पुणे : पुण्यात ॲपलने अधिकृत स्टोअर सुरू केले आहे. कोपा मॉलमध्ये सुरू झालेल्या या स्टोअरला पुणेकरांनी चांगलाच प्रतिसाद दिलाय. iPhone १७ लाँच झाल्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी गर्दी केली होती.
ॲपल स्टोअर बाहेर iPhone खरेदीसाठी सकाळपासूनच स्टोअरबाहेर ग्राहकांची रांग लागली होती. आयफोन खरेदीसाठी विशेषतः तरुण वर्गाचा सहभाग मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाला . त्यांचा केवळ नवीन फोन खरेदी करण्याचा हेतू नसून, ॲपलच्या नव्या तंत्रज्ञानाचा अनुभव घेण्याचीही उत्सुकताही दिसून आली.
आयफोन १७ सिरीजमध्ये तीन मॉडेल्स – iPhone १७, iPhone १७ प्रो आणि iPhone १७ प्रो मॅक्स – उपलब्ध असून त्यांची किंमत ९०,००० पासून सुरू होते. यामध्ये A१९ बायोनिक चिपसेटसारखे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे, ज्यामुळे फोनचा परफॉर्मन्स अधिक वेगवान झाला आहे.
नवीन ‘डायनॅमिक आयलंड’ फीचरमुळे युजरला अधिक सुलभ आणि स्मार्ट अनुभव मिळतो. मुख्य ५०MP कॅमेऱ्यामुळे कमी प्रकाशातही उत्कृष्ट फोटोग्राफी शक्य होते. प्रो आणि प्रो मॅक्स मॉडेल्समध्ये ‘प्रोमोशन डिस्प्ले’ आणि ‘पेरिस्कोप लेन्स’ यांसारखी प्रगत फीचर्स देण्यात आली आहेत, जी फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफीसाठी उपयुक्त ठरतात.
या नव्या मॉडेल्समध्ये टायटेनियम बॉडीचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे फोन अधिक टिकाऊ आणि हलका झाला आहे. तसेच, बॅटरीची क्षमता वाढवण्यात आल्याने त्याचा वापरही अधिक काळ करता येतो.
पुण्यातील या नवीन ॲपल स्टोअरला अनुभवण्यासाठी आणि पाहण्यासाठी अनेक लोक आले होते. ज्यामुळे लोकांची iPhone साठी असलेली क्रेझ पाहायला मिळाली.