हे कॉल सेंटर प्रामुख्याने अमेरिका आणि कॅनडामधील परदेशी नागरिकांची फसवणूक करत होते. ते स्वतः अॅमेझॉन सपोर्ट स्टाफ असल्याचे भासवून आणि गिफ्ट कार्ड तसेच क्रिप्टोकरन्सीद्वारे पैसे मिळवण्यासाठी फिशिंग कॉल आणि फसव्या पद्धतींचा वापर करत होते.
सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, हे कॉल सेंटर विमा एजंट असल्याचे भासवून परदेशी नागरिकांशी संपर्क साधत होते, आणि त्यांचकडून लाखो रुपयांची लूट केली जात होती. धक्कादायक बाब म्हणजे गैरकृत्यासाठी तब्बल ६० जणांना कामावर ठेवण्यात आले होते.
या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना ठाणे सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आले आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, यात आणखी काही लोकांचादेखील सहभाग आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत आणखी काही लोकांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कॉल सेंटरवर केलेल्या कारवाईत सीबीआयला परदेशी नागरिकांची फसवणूक केल्याचे अनेक पुरावे मोठ्या प्रमाणावर हाती लागले आहेत. याबरोबरच, सदर ठिकाणी तब्बल ५ लाख रुपये रोख, मोबाईल हँडसेट्स, संगणक, लॅपटॉप आणि इतर डिजिटल उपकरणे देखील जप्त करण्यात आली आहेत.