पुणे : पुण्यात तब्बल ३३ तास अखंड सुरू राहिलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत हजारो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. घरगुती तसेच मोठ्या मंडळांच्या गणपतींचं विसर्जन भक्तिभावाने पार पडलं. मात्र, या धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणात एक संतापजनक घटना घडली. मिरवणुकीदरम्यान ढोल-ताशा वाजवणाऱ्या पथकातील काही सदस्यांनी एका महिला पत्रकाराचा विनयभंग केल्याची धक्कादायक बाब समोर आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून कारवाई सुरू केली. या गुन्ह्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी दोन ढोल-ताशा पथकातील सदस्यांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यभरात गणेश विसर्जन मिरवणुका पार पडल्या. पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. याच ठिकाणी वार्तांकनासाठी गेलेल्या २० वर्षीय महिला पत्रकार आणि त्यांच्या सहकाऱ्याला अचानक अडथळा निर्माण करण्यात आला. पथकातील काही सदस्यांनी त्यांना थांबवून त्रास दिला आणि याच दरम्यान महिला पत्रकाराचा विनयभंग झाल्याची गंभीर घटना घडली.
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक (Police Sub Inspector) पदाच्या परीक्षेत महाराष्ट्रातून मुलींमधून २०२३ मध्ये पहिल्या आलेल्या अश्विनी केदारी ...
महिला पत्रकारासोबत गैरवर्तन, सहकाऱ्यालाही मारहाण
दरम्यान, गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान त्रिताल ढोल-ताशा पथकातील सदस्यांनी महिला पत्रकार आणि त्यांच्या सहकाऱ्याचा मार्ग रोखला. याच दरम्यान पथकातील एका सदस्याने ढोल-ताशा ट्रॉलीचे चाक थेट महिला पत्रकाराच्या पायावर फिरवले. त्यांनी जाब विचारण्यासाठी पुढे सरकल्यावर त्या सदस्याने महिलेला स्पर्श करून ढकलल्याची धक्कादायक घटना घडली. त्यांच्या सहकाऱ्याने या प्रकारावर आवाज उठवला असता, त्यालाही शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर महिला पत्रकाराने तातडीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली. फरासखाना पोलीस ठाण्यात दोन ढोल-ताशा पथक सदस्यांविरोधात गुन्हा दाखल झाला असून सध्या तपास सुरू आहे. या प्रकारावर आमदार रोहित पवार आणि शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी तीव्र संताप व्यक्त करत महिला पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेध केला आहे.
छायाचित्रकारांना त्रास, मंडळांत धक्काबुक्की
पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर गणेश विसर्जन मिरवणुकीचे वार्तांकन करत असताना छायाचित्रकारांना ताल ढोल-ताशा पथकातील वादकांकडून धक्काबुक्की केल्याची घटना समोर आली आहे. फोटो काढण्यास थेट मनाई करत त्यांना रस्त्यावरून जबरदस्ती बाजूला करण्यात आले. दरम्यान, बेलबाग चौकात जिलब्या मारुती मंडळाची मिरवणूक टिळक पुतळ्याकडून येत असताना शिवाजी रस्त्यावरील मुठेश्वर मंडळ पुढे आले. या वेळी दोन्ही मंडळांच्या ढोल-ताशा पथकातील सदस्यांत पुढे जाण्याच्या वादातून हाणामारी झाली. मात्र, मंडळ कार्यकर्ते आणि पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करत हा तणाव वाढण्यापूर्वीच मिटवला.