परळी : परळी रेल्वे स्थानक परिसरात अवघ्या चार वर्षांच्या बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात दुःख, संताप आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. निर्दयी प्रकाराने समाजमनाला चीड आली असून या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी परळी शहरात हजारोंच्या संख्येने नागरिकांनी एकत्र येत भव्य मूक मोर्चाचे आयोजन केले. या मोर्चात शहरातील विविध सामाजिक संघटना, महिला मंडळे, महाविद्यालयीन विद्यार्थी, व्यापारी तसेच मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य नागरिक स्वयंप्रेरणेने सहभागी झाले होते. हातात फलक घेऊन, 'बालिकेला न्याय मिळावा' अशी मागणी करत नागरिकांनी शांततेत मार्गक्रमण केले. मोर्चाच्या माध्यमातून नागरिकांनी आरोपीवर त्वरीत आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली. आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी, प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात घेऊन जलद गतीने सुनावणी करून पीडितेला न्याय मिळवून द्यावा, असा ठाम आग्रह मोर्चादरम्यान व्यक्त करण्यात आला.
परळी रेल्वे स्थानक परिसरात अवघ्या चार वर्षांच्या निष्पाप बालिकेवर अत्याचार झाल्याचे उघड होताच संपूर्ण शहरात भीती, संताप आणि खळबळ उडाली आहे. या अमानुष कृत्यामुळे परिसरातील नागरिकांच्या भावना तीव्रपणे दुःखावल्या असून संतापाची लाट उसळली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरीत दाखल होत तपासाला सुरुवात केली. कमी कालावधीतच गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन बरकत नगर येथून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या या जलद कारवाईचे स्वागत होत असतानाच आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जनतेकडून जोर धरू लागली आहे.
नागरिकांचा भव्य मूक मोर्चा
या निर्दयी प्रकाराने समाजमनाला चीड आली असून या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी परळी शहरात राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकातून रेल्वे स्टेशन परिसरापर्यंत शांततेत हजारोंच्या संख्येने नागरिकांनी एकत्र येत भव्य मूक मोर्चाचे आयोजन केले. या मोर्चात शहरातील विविध सामाजिक संघटना, महिला मंडळे, महाविद्यालयीन विद्यार्थी, व्यापारी तसेच मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य नागरिक स्वयंप्रेरणेने सहभागी झाले होते. हातात फलक घेऊन, 'बालिकेला न्याय मिळावा' अशी मागणी करत नागरिकांनी शांततेत मार्गक्रमण केले.
आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी – नागरिकांची ठाम भूमिका
बालिकेवरील अमानुष अत्याचारप्रकरणी परळी शहरात काढण्यात आलेल्या मूक मोर्चात नागरिकांनी एकमुखाने संताप व्यक्त केला. मोर्चात सहभागी झालेल्या अनेकांनी आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी, त्याला कोणतीही कायदेशीर सूट देऊ नये, अशी ठाम मागणी केली. घटनेच्या गंभीरतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी "अशा नराधमांना समाजात जागा नाही" असा रोखठोक आवाज बुलंद केला. मोर्चादरम्यान नागरिक आणि विविध संघटनांकडून आणखी एक महत्त्वाची मागणी पुढे आली. या प्रकरणाची सुनावणी लांबणीवर न जाता फास्टट्रॅक कोर्टात करण्यात यावी, तसेच बालिकेला तातडीने न्याय मिळावा, यासाठी प्रक्रिया जलदगतीने पार पडावी, असा ठाम आग्रह यावेळी व्यक्त करण्यात आला. पीडित कुटुंबाचे दुःख कमी करण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया गुंतागुंतीची न ठेवता जलद न्याय मिळावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.
महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजनांची मागणी
सार्वजनिक ठिकाणी वाढत्या असुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी परळी रेल्वे स्थानक परिसरात सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्यावर भर दिला. रेल्वे स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, सुरक्षारक्षकांची संख्या वाढवावी आणि महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी ठाम मागणी मोर्चात मांडण्यात आली. भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी ही पावले उचलणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
स्थानकातील कर्मचाऱ्यावर चौकशी करण्याची मागणी
मोर्चादरम्यान एक गंभीर आरोपही नागरिकांनी पुढे केला. घटनेच्या दिवशी रेल्वे स्थानकातील एका कर्मचाऱ्याने आरोपीविरुद्ध योग्य कारवाई करण्यात टाळाटाळ केली, असा आरोप नागरिकांनी केला. या कर्मचाऱ्याने तात्काळ जबाबदारी पार पाडण्यात कसूर केल्याचे सांगून त्याची चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी तीव्रतेने करण्यात आली.
मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर गेले ५ दिवस नेते मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषण केले होते, ज्यात त्यांनी यश मिळवले ...
घटनेचा थरकाप उडवणारा तपशील! रडत-बिचकत आईकडे परतली चिमुरडी
रविवारी (३१ ऑगस्ट) दुपारी घडलेली बालिकेवरील अमानुष घटना संपूर्ण जिल्हा हादरवून टाकणारी ठरली आहे. पंढरपूर येथील एक दाम्पत्य रोजगाराच्या शोधात परळीत आले होते. कुटुंब रेल्वे स्थानक परिसरात थांबले होते. तोच काळजीचा क्षण काळ बनून उभा राहिला. सदर दाम्पत्यातील महिला प्रवासामुळे आजारी पडली होती. तिला रेल्वे स्थानक परिसरात झोप घेण्याची गरज भासली. त्याच वेळी आरोपीने संधी साधली. निष्पाप असलेल्या केवळ चार वर्षांच्या चिमुरडीला आपल्या तावडीत घेत तो स्थानकाच्या एका निर्जन कोपऱ्यात घेऊन गेला. तिथेच त्याने अमानुष पद्धतीने अत्याचार केला. काही वेळानंतर रडत, थरथरत आणि भीतीने व्याकुळ झालेली बालिका पुन्हा आईजवळ परतली. आईने मुलीची अवस्था पाहून विचारपूस केली असता तिच्या तोंडून सत्य बाहेर आले. बालिकेवर झालेल्या अत्याचाराचा भयानक तपशील समजताच आई-वडील हतबल झाले. उपस्थित नागरिक व प्रवाशांमध्ये संतापाची भावना पसरली. ही धक्कादायक घटना काही तासांतच स्थानिक परिसरात वाऱ्यासारखी पसरली. रेल्वे स्थानक आणि शहरात तीव्र संतापाची लाट उसळली. नागरिकांमध्ये चिंता, संताप आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. समाजाच्या सर्व स्तरांतून या अमानुष प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी सुरू झाली आहे.
आरोपीला पोलिसांची तात्काळ अटक
बालिकेवरील अत्याचाराची माहिती मिळताच पोलिसांनी चोख कारवाई करत काही तासांतच आरोपीला बेड्या ठोकल्या. परळी शहर पोलिसांनी केलेल्या तपासानंतर बरकत नगर येथे आरोपी लपून बसल्याचे समोर आले. तातडीने सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. पोलिसांच्या या जलद कारवाईचे परिसरात कौतुक होत असले, तरी संतप्त नागरिक आरोपीला कठोर शिक्षा होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याच्या भूमिकेत आहेत. मूक मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी उद्रेकाने आवाज बुलंद करून इशारा दिला की, आरोपीवर कायद्याच्या कचाट्यात कठोर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील. "फाशीशिवाय दुसरा पर्याय नाही," अशा घोषणा देत नागरिकांनी संताप व्यक्त केला.ही घटना केवळ परळीपुरती मर्यादित राहिली नाही. परळीतील नागरिकच नव्हे तर संपूर्ण बीड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. प्रत्येक गावातून, प्रत्येक समाजघटकातून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. महिला संघटना, विद्यार्थी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणावरून मोठ्या प्रमाणावर एकत्र येत रोष व्यक्त केला आहे.