Manoj Jarange Patil Mumbai Morcha : “मराठ्यांचं पाणी बंद केलं तर आयुक्तांना सुट्टी नाही!” BMC आयुक्तांना जरांगेंचा थेट इशारा; म्हणाले,“कधी ना कधी हिशोब होणारच”...फक्त नाव लिहून ठेवा!

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानात सुरू असलेले मराठा समाजाचे आंदोलन (Maratha Reservation) शुक्रवारी अधिकृतपणे रंगात आले. राज्यभरातून मोठ्या संख्येने आलेले मराठा बांधव काल रात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकावरच थांबले होते. शेकडो आंदोलक फलाटांवर झोपून सकाळपर्यंत पोहोचले आणि त्यानंतर आझाद मैदानात ठिय्या मांडला. मात्र, आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी आंदोलकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. आझाद मैदान परिसरातील शौचालयांमध्ये पाणी नसल्याने स्वच्छतेची गंभीर समस्या निर्माण झाली. शिवाय मुंबई महानगरपालिकेने (BMC) या भागातील हॉटेल्स आणि खाऊगल्ली बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने आंदोलकांना अन्नाची टंचाई भासली. परिणामी आंदोलकांचे सकाळपासूनच प्रचंड हाल झाले. यावरून संतप्त होत मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी बीएमसी आयुक्तांना थेट इशारा दिला. आंदोलनादरम्यान अशा प्रकारे मूलभूत सोयींवर गदा आणली, तर आंदोलकांचा संताप आणखी वाढेल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.



गाड्या मैदानावरच लावा - जरांगे पाटील यांचे निर्देश


“आम्हाला राजकारण करायचं नाही, आम्हाला फक्त आरक्षण हवं आहे. मात्र मुख्यमंत्री राजकारण करतात, आरक्षण द्यायची त्यांची तयारी नाही,” असा आरोप करत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. जरांगे पाटील यांनी उपस्थित मराठा बांधवांना शिस्त आणि शांतता राखण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, “तुमच्या गाड्या सरकारने दिलेल्या मैदानावर लावा. बीपीटी ग्राउंड, शिवडी आणि वाशीच्या मैदानावर गाड्यांचे पार्किंग करा. वाशीचं मैदान २०-२२ किलोमीटरवर आहे, तिथेही काही गाड्या लावा. मुंबईत मराठे आलेत, हे चुकीचं नाही. ते काही वाईट करणार नाहीत, हा माझा शब्द आहे.” यावेळी त्यांनी मराठा तरुणांना थेट संदेश देत सांगितले की, “माझ्या पोरांनी अजिबात वाईट करायचं नाही. संयम ठेवा, शांत रहा, आपल्याला फक्त आरक्षण मिळवायचं आहे.”



आरक्षण मिळेपर्यंत संयम ठेवा”, आंदोलकांना आवाहन


आपल्याला हे आंदोलन शांततेत पार पाडून जिंकायचे आहे. गोंधळ घालणाऱ्यांचा काय उद्देश आहे हे मला माहित नाही. पण, त्या गोंधळ घालणाऱ्यांना सांगा की तुम्ही आंदोलनाची दिशा सध्या शांततेत ठेवा. बघू हे लोक आरक्षण देतात की नाही. तुम्ही सगळे शांततेने राहा, असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
“आपल्याला हे आंदोलन शांततेत पार पाडूनच जिंकायचं आहे. गोंधळ घालणाऱ्यांचा उद्देश काय आहे हे मला ठाऊक नाही, पण त्यांनी जर आंदोलनाची दिशा बदलण्याचा प्रयत्न केला तर त्यांना थांबवा,” असे त्यांनी स्पष्ट सांगितले. जरांगे पाटील पुढे म्हणाले की, “आपल्या हातात संयम आहे. शांततेत राहून आपण सरकारला दाखवून देऊ की, आपला लढा हा हक्कासाठी आहे. बघू या की हे लोक आपल्याला आरक्षण देतात की नाही. पण, आंदोलनाचा मार्ग हा शांततेचाच असायला हवा.” त्यांच्या या आवाहनाला आंदोलकांनी जोरदार प्रतिसाद दिला असून आंदोलनाचा स्वर अधिक शिस्तबद्ध आणि संयमी ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.



जरांगे पाटलांचा बीएमसी आयुक्तांना थेट इशारा


मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई महापालिकेच्या (BMC) आयुक्तांना थेट इशारा दिला आहे. आंदोलनकर्त्यांना पाणी आणि अन्न मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी आयुक्तांवर गंभीर आरोप केले. जरांगे पाटील म्हणाले, “बीएमसी आणि सीएसएमटीसमोरच्या माझ्या पोरांना मी सांगतो की, शांततेने घ्या. तुम्हाला कालपासून जेवायला मिळालं नाही, मुख्यमंत्री तुम्हाला पाणी मिळू देत नाहीत. कारण सध्या प्रशासक आहेत आणि संपूर्ण कंट्रोल मुख्यमंत्र्यांकडे आहे.” यावेळी त्यांनी थेट आयुक्तांना उद्देशून कठोर शब्द वापरले. “आयुक्त साहेब, लक्षात ठेवा... कधी ना कधीतरी वेळ बदलतेच. तुम्ही सेवानिवृत्त झालात तरी सुट्टी मिळणार नाही. कारण तुम्ही मराठ्यांच्या पोरांचं पाणी बंद केलंय. मोठमोठ्यांची जिरली आहे, मग तुमचा प्रश्नच काय? सगळ्याचा हिशोब होईल. बीएमसीचा आयुक्त कोण आहे ते लोकांनी नाव लिहून ठेवा,” असा इशारा जरांगे पाटलांनी दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.



पोरांना डिवचू नका


जरांगे म्हणाले, “मुख्यमंत्र्यांचं ऐकून आमच्या पोरांचं पाणी बंद केलं, बाथरूम बंद केलं, दुकाने बंद केली. बीएमसी आणि सीएसएमटी परिसरात जमलेल्या पोरांना मी सांगतो, हाल होऊ द्या, पण संयम ठेवा. पोलिसांनाही माझी विनंती आहे, पोरांना डिवचू नका, विनाकारण ताण देऊ नका,” असा इशारा त्यांनी दिला.
आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी अन्न-पाणी, शौचालय यांसारख्या मूलभूत सुविधांवर मर्यादा आणल्याने आंदोलकांमध्ये नाराजी आहे. त्याच पार्श्वभूमीवर जरांगे यांनी सरकार आणि पोलिसांना ठामपणे संदेश दिला आहे.

Comments
Add Comment

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या