पुणे: मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील येत्या २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मराठा मोर्चा घेऊन धडकणार आहेत. या दरम्यान गणेशोत्सव असल्याकारणामुळे मुंबईत ऐन सणासुदीच्या वेळेत जरांगेचा जाळपोळ करण्याचा आणि दंगली घडवून आणण्याचा प्रोग्राम असल्याचा खळबळजनक आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे पाटील मराठा समाजाबरोबर मुंबईत दिनांक २९ ऑगस्टला कूच करणार आहेत . यावरूनच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगेवर टीका केली. बीड शहर जरांगे पाटील यांनी जाळलं. त्याच गोष्टी त्यांना मुंबईमध्ये करायच्या आहेत असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच त्यांनी जरांगे यांना मुंबईत येण्यापासून रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती देखील केली आहे.
जरांगे पाटील यांना अंतरवालीतच उपोषण करू द्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विनंती करत जरांगे पाटील यांना अंतरवालीतच उपोषण करू द्या. पण महाराष्ट्रात सणासुदीचे वातावरण जाळपोळ करण्याचा डाव जरांगे पाटील यांना करायचा तो प्रयत्न रोखावा, अशी मागणी देखील हाके यांनी केली. पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यानंतर लक्ष्मण हाके हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधलाय.
शरद पवारांच्या मंडल आयोगावर टिका
महाराष्ट्रातील वातावरण बिघडवायचे हा एकमेव कार्यक्रम शरद पवार (Sharad Pawar) आणि जरांगे पाटील यांचा आहे. जरांगेच्या झुंडशाहीला बळी पडून प्रशासनाने वेगळा निर्णय घेतला तर त्याला ओबीसी समाज प्रत्युत्तर देईल, असा इशारा देखील लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. मंडल आयोगाचे जनक शरद पवार ही शुद्ध भामटेगिरी असून ओबीसींना वेड्यात आणि मुर्खात काढण्याचा प्रयत्न शरद पवार पक्षाचा असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे.
लक्ष्मण हाके पुढे म्हणाले की, मनोज जरांगेंची भाषा चिथावणीखोर आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तुरुंगात डांबलं पाहिजे. बेकायदेशीर मागणी करत असताना त्यांचे लाड का केले जातात? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. तर जरांगे पाटील यांनी थोडासा अभ्यास करून हिंदी विषयाचे अवलोकन करावे, असा सल्ला देखील लक्ष्मण हाके यांनी यावेळी दिला आहे.