उत्तरकाशी : उत्तराखंडमधील उत्तरकाशी परिसरात ढगफुटी झाल्यामुळे पूर आला. सततचा मुसळधार पाऊस आणि पूर यामुळे नद्यांचे पाणी आणि चिखल गावातील असंख्य घरात शिरले. अनेक घरांची वाताहत झाली. चारधामपैकी एक असणाऱ्या गंगोत्रीजवळ कायमच पर्यटकांची गर्दी असते. याच भागात नैसर्गिक आपत्तीचा मोठा तडाखा बसला. उत्तरकाशीत आता सैन्याच्या आणि एनडीआरएफच्या मदतीने मदतकार्य वेगाने सुरू आहे.
उत्तराखंडमध्ये पर्यटन आणि चारधाम यात्रेच्या निमित्ताने अनेक राज्यांतून पर्यटक येत असतात. ढगफुटी झाली त्यावेळीही लाखो पर्यटक राज्यात होते. उत्तरकाशीत ढगफुटीमुळे अनेक पर्यटक संकटात सापडले. सतत ठिकठिकाणी जमीन खचत असल्यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सर्व जण मिळेल त्या वाटेने सुरक्षित ठिकाण गाठण्याचा आणि शक्य तितक्या लवकर घरी परतण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारी आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील किमान १५१ पर्यटक ढगफुटीनंतर उत्तराखंडमध्ये अडकले. यापैकी १२० जणांशी संपर्क झाला आहे. इतरांचा शोध सुरू आहे.
ढगफुटीनंतर उत्तरकाशीत अनेक ठिकाणी मोबाईल नेटवर्क विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी विजेचा पुरवठा खंडीत झाला आहे. रस्ते वाहून गेले आहेत किंवा खचले आहेत. सततच्या पावसामुळे आणि पुरामुळे अनेकांशी संपर्क करणे कठीण झाले आहे. या प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संपर्क न होऊ शकलेल्यांना शोधण्यासाठी हवाई पाहणी तसेच इतर आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे.