सिंधुदुर्ग - महायुतीची सध्याची राजकीय परिस्थिती चांगली असून, कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची वादग्रस्त विधाने करू नयेत, सर्वांनी समन्वयाने काम करावे. त्यामुळे विकासाला गती मिळेल.असा सल्लाही माझी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आज सोमवारी दिला.
शक्तीपीठ महामार्ग आता मळगावसह तिलारी आणि रेडीपर्यंत विभागून नेण्याचा प्रयत्न सुरू आहे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेर आदेश दिले आहेत. दोडामार्ग तालुक्यात प्रस्तावित असलेला अम्युझमेंट पार्क, तिलारीचा परिसर आणि रेडीपर्यंतच्या विकासाला चालना देण्यासाठी हा महामार्ग महत्त्वाचा ठरेल, असे केसरकर म्हणाले.
जिल्ह्यात आता चांगली राजकीय परिस्थिती आहे. खासदार, पालकमंत्री, आमदार महायुतीचे आहेत. त्यामुळे तिन्ही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र राहावेत. यापुढे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावणाऱ्या किंवा वाद निर्माण होणार असे प्रकार घडणार नाहीत. कोणतेही वादग्रस्त वक्तव्य कोणी करणार नाही, असे केसरकर म्हणाले.
विदेश दौऱ्यावर गेलेल्या श्री. केसरकर यांनी आज सावंतवाडीत पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आपण नुकताच इंडोनेशिया आणि सिंगापूर येथे पर्यटनाच्या दृष्टीने दौरा केला. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटन विस्तारलेले आहे. साधे हॉटेल पाचशे रूमचे आहे तर सर्वात जास्त हॉटेल ही सात हजार रूमची आहेत. त्या देशांप्रमाणे या ठिकाणी पर्यटन व्हावे, असे आमचे प्रयत्न सुरू आहेत.
याठिकाणी विशेषता पर्यटनाला प्राधान्य दिले जात आहे. मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी दाखल झाल्यामुळे रोजगाराच्या दृष्टीने त्याचा स्थानिकांना फायदा होणार आहे. त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. गुंतवणूकदारांनी या ठिकाणी यावे आणि तिलारीच्या विकासात योगदान द्यावे, अशी आम्ही वारंवार विनंती करत आहोत. त्या दृष्टीने आम्ही निविदा काढल्या होत्या. परंतु अद्याप पर्यंत कोणाचाही प्रतिसाद मिळालेला नाही. तरीही आगामी काळात तिलारी मध्ये होणारे पर्यटन लक्षात घेता त्या ठिकाणी जाणारा रोड हा काँक्रीटचा करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. खासदार, पालकमंत्री, आमदार हे महायुतीचे आहेत. त्यामुळे सर्वजण एकत्र राहिल्यास त्याचा फायदा निश्चितच येणाऱ्या निवडणुकीत होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कोणती वादग्रस्त स्टेटमेंट येणार नाहीत, अशा सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्याचे श्री. केसरकर म्हणाले.