मिळालेल्या माहितीनुसार, ३१ जुलै २०२५ च्या रात्री सीमा सुरक्षा दलाचा जवान सुगम चौधरी बटालियन मुख्यालय, पांथाचौक येथून बेपत्ता झाला. जवान बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच सीमा सुरक्षा दलाने तातडीने शोध मोहीम हाती घेतली. छावणी भोवतालच्या परिसरात शोधाशोध झाली. जवान सापडला नाही. अखेर जवान बेपत्ता असल्याची लेखी तक्रार सीमा सुरक्षा दलाने स्थानिक पोलिसांकडे नोंदवली आहे. सीमा सुरक्षा दलाने संबंधित जवानाचा फोटो आणि त्याच्याशी संबंधित आवश्यक ती माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनीही तक्रार नोंदवून घेतल्यानंतर जवानाचा शोध सुरू केला आहे.
सीमा सुरक्षा दलाच्या साठाव्या बटालियनचा जवान सुगम चौधरी बटालियन मुख्यालय, पांथाचौक येथून बेपत्ता झाला आहे. याआधी डिसेंबर २०२३ मध्ये आणि मे २०२४ मध्ये सीमा सुरक्षा दलाचा प्रत्येकी एक जवान बेपत्ता झाला होता. मानसिक ताण असह्य झाल्यामुळे या घटना घडल्या होत्या. संबंधित जवान ड्युटीवरुन परस्पर बाहेर निघून गेले होते. आता पुन्हा एकदा अशीच घटना घडली आहे.