विजय घाडगे यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आश्वासन
पुणे : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत मंगळवारी निर्णय घेणार, तसेच सूरज चव्हाणला पुन्हा पक्षात घेणार नाही, असे आश्वासन दिल्याची माहिती छावा संघटनेचे विजय घाडगे यांनी दिली. दोन्ही विषयाच्या अनुषंगाने घाडगे यांनी आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यात उपरोक्त विषयावर चर्चा झाली.
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाच एक व्हिडीओ समोर आला होता, हा व्हिडीओ समोर येताच राज्यात वातावरण चांगलंच तापलं. विरोधकांकडून सरकारची कोंडी करण्यात आली. विरोधकांकडून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू आहे. तर दुसरीकडे हा व्हिडीओ समोर आल्यानंतर छावा संघटना चांगलीच आक्रमक झाली होती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे लातूर दौऱ्यावर असताना छावा संघटनेने या प्रकरणी त्यांना निवेदन दिले, तसेच माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. याचवेळी काही कार्यकर्त्यांकडून तटकरे जिथे बसले होते, तिथे त्यांच्या टेबलवर पत्ते फेकण्यात आले. यानंतर तटकरे यांच्यासमोरच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष सूरज चव्हाण त्यांच्या कार्यकर्त्यांसह छावाचे कार्यकर्ते आपसात भिडल्याचं पाहायला मिळाले. यावेळी विजय घाडगे यांना मारहाण करण्यात आली होती. या घटनेनंतर आता विजय घाडगे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.
मुंबई : मराठी कलाकार आणि भाषेवरून सध्या वाद पेटला आहे. अभिनेत्री केतकी चितळेच्या 'मराठी न बोलल्यास भोकं पडणार आहेत का?' या वक्तव्यानंतर आता मराठमोळी ...
अजित पवार यांनी विजय घाडगे यांच्यासोबत चर्चा केली. पवार यांच्या भेटीनंतर घाडगे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासंदर्भात येत्या मंगळवारपर्यंत आपण निर्णय घेऊ, असा शब्द आपल्याला अजित पवार यांनी दिल्याचं घाडगे यांनी सांगितले. तसेच सूरच चव्हाण यांना पुन्हा पक्षात घेणार नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मंगळवारपर्यंत वाट पाहाणार, अन्यथा मंगळवारनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात राज्यभर आंदोलन करणार, असा इशारा यावेळी घाडगे यांनी दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात पक्षात दोन वेगवेगळे मतप्रवाह आहेत. एका गटाचे म्हणणे आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्याने शेतकऱ्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागेल. ज्यामुळे पक्षाला मोठा फटका बसू शकतो. तर दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे की, माणिकराव कोकाटे चार वेळा आमदार झालेले ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांना राजीनामा नको, तर वेगळी जबाबदारी दिली जावी.