ढाका येथील विमान अपघातातील जखमींसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम पाठवणार असल्याचे भारताने केले जाहीर
नवी दिल्ली: अहमदाबाद विमान अपघात प्रकरणाची जखम ताजी असतानाच, बांगलादेश येथील विमान अपघात घटनेचा सर्वांनाच धक्का बसला आहे. बांगलादेशी हवाई दलाचे एक प्रशिक्षणार्थी लढाऊ विमान ढाका येथील शाळा आणि महाविद्यालयाच्या इमारतीशी आदळून खाली कोसळले. या अपघातात मोठ्या संख्येने शालेय तसेच महाविद्यालयीन मुलांचा मृत्यू झाला. बांगलादेश वर कोसळलेल्या या संकटाच्या काळात शेजार धर्म म्हणून, भारताने मदतीचा हात पुढे केला आहे. बांगलादेशातील विमान अपघातातील जखमींवर उपचार करण्यासाठी विशेष डॉक्टर आणि परिचारिकांची टीम पाठवली जात असल्याचे भारताने म्हटले आहे.
बांगलादेशला भारताकडून वैद्यकीय मदत
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी याबद्दल माहिती दिली. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, "'बर्न-स्पेशालिस्ट' डॉक्टर आणि परिचारिकांचे एक पथक लवकरच आवश्यक वैद्यकीय मदत घेऊन बांगलादेशातील ढाका येथे जाईल. बर्न-स्पेशालिस्ट डॉक्टर हे भाजलेल्या जखमांवर उपचार करण्यात तज्ज्ञ आहेत. ही टीम रुग्णांच्या स्थितीचे मूल्यांकन करेल आणि गरजेनुसार भारतात पुढील उपचार आणि विशेष काळजी घेण्याची शिफारस करेल." मिळालेल्या माहितीनुसार, ढाका येथे जाणाऱ्या पथकात दिल्लीतील दोन डॉक्टरांचा समावेश आहे. त्यापैकी एक राम मनोहर लोहिया रुग्णालयातील आहे आणि दुसरे सफदरजंग रुग्णालयातील आहेत.
अपघात कसा घडला?
खरं तर, सोमवार, २१ जुलै रोजी बांगलादेश हवाई दलाचे एक प्रशिक्षणार्थी लढाऊ विमान ढाका येथील माइलस्टोन स्कूल अँड कॉलेजच्या इमारतीवर आदळून खाली कोसळले. या अपघाताचे भयानक फोटो आणि व्हिडिओ समोर आले होते. आतापर्यंत या विमान अपघातात किमान ३१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातादरम्यान शालेय वर्ग सुरु होते, त्यामुळे मृतांमध्ये २५ मुलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत.
पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ढाका येथील विमान अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच बांगलादेशला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. पंतप्रधान मोदींनी एक्स वर म्हटले आहे- "ढाका येथील दुर्दैवी विमान अपघातात झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानीमुळे आम्हाला खूप धक्का बसला आहे. यात बरेच तरुण विद्यार्थी होते. आमच्या संवेदना त्यांच्या कुटुंबांसोबत आहेत. अपघातात जखमीं झालेले लवकरात लवकर बरे होवो यासाठी आम्ही प्रार्थना करतो. या काळात भारत बांगलादेशसोबत एकजुटीने उभा आहे आणि सर्व शक्य मदत तसेच पाठिंबा देण्यास तयार आहे."