पुणे : पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. वाहतूक शाखेतील हवालदार राजेंद्र गायकवाड (वय ४२) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. धानोरी, लोहगाव येथील त्यांच्या घरी शनिवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. त्यांच्या निधनामुळे कुटुंब आणि सहकाऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, आत्महत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
ही घटना त्यावेळी समोर आली जेव्हा गायकवाड यांची १२ आणि १४ वर्षांची दोन मुले शाळेतून घरी परतली आणि त्यांना घराचा दरवाजा आतून बंद दिसला. त्यांच्या पत्नी दौंड येथे गेल्या होत्या. त्यांच्या आईने वारंवार फोन करूनही राजेंद्र गायकवाड यांनी प्रतिसाद दिला नाही. मुलांनी शेजाऱ्यांची मदत मागितली आणि परिस्थिती संशयास्पद वाटल्याने शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, राजेंद्र गायकवाड यांनी घरातच गळफास घेतल्याचे दिसून आले. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडली नसल्याने त्यांच्या आत्महत्येमागील कारण अस्पष्ट आहे.
विमानतळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. राजेंद्र गायकवाड यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.