मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) मध्ये नेतृत्व पातळीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्यानंतर शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यानंतर आता आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तसेच सर्व फ्रंटल आणि सेलच्या प्रभारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वरून ही माहिती दिली.
सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "रोहित यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची संघटनात्मक बांधणी आणखी मजबूत होईल, याची मला खात्री आहे. स्व. यशवंतराव चव्हाण साहेब आणि आदरणीय पवार साहेब यांच्या विचारांचा वस्तुपाठ डोळ्यांसमोर ठेवून ते कार्यरत आहेत. नूतन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांची वैचारिक चौकट अधिक बळकट करण्यासाठी रोहित पवार नेहमी प्रयत्नशील राहतील, असा मला विश्वास आहे."जयंत पाटील यांनी मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर लगेचच पक्षात नवीन नेतृत्वाची निवड सुरू झाली. शशिकांत शिंदे यांना एकमताने अध्यक्षपदी निवडण्यात आले. आता रोहित पवार यांना प्रदेश पातळीवर दुसऱ्या क्रमांकाची महत्त्वाची जबाबदारी दिली गेली आहे.
या नव्या घडामोडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची संघटनात्मक रचना बळकट करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे, असे राजकीय वर्तुळात मानले जात आहे. रोहित पवार यांच्या अनुभवाचा आणि तरुण नेतृत्वाचा फायदा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये मिळू शकतो, अशी चर्चा आहे.