'संयमाची परीक्षा पाहू नका, नाहीतर...' भाषावादाच्या पार्श्वभूमीवर शेलारांची मनसेला तंबी
मुंबई: शनिवारी झालेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आल्याने भविष्यात उबाठा आणि मनसे यांची युती होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. या मेळाव्याबाबत विविध राजकर्त्यांनी आणि मंत्री महोदयांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या. यामुळे राज्यातील राजकारणात आता नवा ट्विस्ट येणार असल्याचं म्हंटलं जातंय. दरम्यान, भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी देखील आज झालेल्या पत्रकार परिषदेत आपली प्रतिक्रिया दिली. ज्यात त्यांनी मनसेवर केवळ टीकाच केली नाही तर त्यांची तुलना थेट पहलगाममधील दहशतवाद्यांसोबत केली आहे.
राज ठाकरे यांना मराठी भाषेवरून आव्हान देणारी एक पोस्ट व्यावसायिक सुशील केडिया यांनी सोशल मिडियावर पोस्ट केली होती. ज्यामुळे मनसैनिकांनी शनिवारी केडियाच्या कार्यालयाची तोडफोड केली. त्यानंतर आता मुंबईत झालेल्या भाषावादाच्या पार्श्वभूमीवर, शेलार यांनी मनसेच्या कार्यपद्धतीची थेट काश्मीरमधील दहशतवाद्यांशी तुलना करत खळबळजनक वक्तव्य केले.
मनसैनिकांची दहशतवाद्यांसोबत तुलना...
आशिष शेलार यांनी म्हटले की, "पहलगाममध्ये धर्म विचारून हिंदू पर्यटकांवर गोळ्या झाडल्या जातात आणि इथे (महाराष्ट्रात) भाषा विचारून हिंदू धर्मीयांवर हल्ले केले जात आहेत. यात फरक काय?" असा सवाल करत शेलार यांनी मनसेवर गंभीर आरोप केला. त्यांनी स्पष्ट केलं की, सत्तेत भाजप मोठा भाऊ असल्यामुळे संयम पाळतो आहोत, पण या संयमाची परीक्षा पाहू नका, असा इशाराही त्यांनी मनसेला दिला.
मुंबईसह राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून मराठी-हिंदी भाषेच्या मुद्यावरून वातावरण तापलं आहे. काही ठिकाणी बिगर मराठी नागरिकांना झालेल्या कथित मारहाणीच्या घटना, सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वाद वाढला. याच पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी हा थेट आणि तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. शेलार यांच्या या वक्तव्याने आगामी काळात भाजप-मनसे संबंधात दरी वाढणार की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तर, शेलार यांच्या वक्तव्यावर मनसैनिक कशी प्रतिक्रिया देणार, याकडे देखील सर्वांचे लक्ष आहे.