
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले यंत्रणांना निर्देश
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांपैकी बहुतांश कामे प्रगतिपथावर असून त्यांचे उद्घाटन १५ ऑगस्टपर्यंत करण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी नियोजन करावे, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.
ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध विकास कामे व शासनाकडील मंजूर निधी खर्च करणे, एमएमआरडीएच्या माध्यमातून होणाऱ्या रस्त्यांचा आढावा घेणे आणि घोडबंदर येथील रस्त्यांची कामे आदी विषयाबाबत आढावा बैठकीचे आयोजन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे महापालिका मुख्यालयात कै. अरविंद पेंडसे सभागृह येथे गुरूवारी करण्यात आले होते.
या बैठकीस, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, सहाय्यक संचालक नगररचना संग्राम कानडे, एमएमआरडीएचे संचालक (प्रकल्प) अनिल साळुंखे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे, मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता विनय सुर्वे यांच्यासह महापालिका, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
घोडबंदर रोड आणि परिसरात सुरू असलेल्या सर्व कामांमुळे येत्या काही महिन्यात या भागाचे चित्र आणखी बदललेले दिसणार आहे. त्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय साधून कामे मार्गी लावावीत, असे परिवहन मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले. तसेच, पावसाळ्यात पाणी साठू नये, घोडबंदर भागातील गावांना पावसाच्या पाण्याचा त्रास होऊ नये यासाठी, सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे. त्यादृष्टीने, महापालिकेने या भागात २२ कल्व्हर्टची साफसफाई केली आहे. त्यात, चार कल्व्हर्ट पूर्णपणे बुजलेले होते, तेही साफ करण्यात आले आहेत. त्याचा पावसाळ्यात निश्चितपणे फायदा होईल, असे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
गायमुख घाटातील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आवश्यक भूसंपादनाचा अभ्यास आतापासूनच करावा, अशी सूचनाही त्यांनी केली. तर, एमएमआरडीएमार्फत १९ रस्त्यांची कामे करण्यात येत आहेत. त्यातील रस्त्यांचे सर्वेक्षण झाले असून २ रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत. एकूण भूसंपादनापैकी ४६ टक्के भूसंपादन बाकी असून त्यास महापालिका प्राधान्य देईल, असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या बैठकीत स्पष्ट केले. तसेच, १५ ऑगस्टपर्यंत उद्घाटन करण्याच्या दृष्टीने सर्व विभागांनी तयारी करावी, असेही निर्देश आयुक्त राव यांनी दिले.