विज्ञानातला एक ध्रुवतारा

अच्युत गोडबोले


जयंतराव नारळीकर आपल्यातून निघून गेले ही बातमी सकाळी ऐकली आणि खूप बेचैन झालो. याचे कारण विज्ञानातला खरं म्हणजे एक ध्रुवताराच निखळला होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर खऱ्या अर्थाने विज्ञानावर संशोधन करणाऱ्यांपैकी आणि भारतात परत येऊन भारतामध्ये वैज्ञानिक संशोधन आणि विवेकवादी तसेच विज्ञानवादी दृष्टिकोन वाढवण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले त्याला आपल्या सगळ्यांचा सलाम !


नारळीकर हे फक्त वैज्ञानिक नव्हते, तर ते विज्ञान लेखक आणि साहित्यिकही होते. दुर्गा भागवतांनी त्यांच्या विज्ञानकथांचे खूप कौतुकही केले होते. त्यांचे यक्षाची देणगी हे पुस्तक वाचून मी खूप भारावून गेलो होतो. त्यानंतर त्यांची टाईम ट्रॅव्हल, अवकाशातले स्फोट अशा अनेक विषयांवरची पुस्तके वाचली. मग त्यांच्या कादंबऱ्या झाल्या. त्यांनी मराठी साहित्यात एवढी भर घातली की. २०२१ सालचे साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले.


पण खरं त्यांचे योगदान हे विश्वविज्ञान किंवा कॉस्मोलॉजी याविषयीचे होते. नारळीकर केंब्रिजला गेले, तिथे रँगलर झाले, फ्रेड हॉईल या तिथल्या प्रसिद्ध वैज्ञानिकाच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले आणि त्यांच्याचबरोबर हॉईल-नारळीकर थेअरी मांडली. गेल्या शतकात विश्वनिर्मितीच्या विषयी दोन महत्त्वाचे विचार किंवा थेअरीज निर्माण झाल्या. एक म्हणजे बिग बँग आणि दुसरी म्हणजे स्टेडी स्टेट. बिग बँगच्या थेअरीप्रमाणे विश्व एका बिंदूपासून स्फोट होऊन निर्माण झाले आणि ते प्रसरण पावत राहिले. पण त्याविरुद्ध हॉईल आणि नारळीकर स्टेडी स्टेटची थेअरी मांडत होते. काही दशकं हा वाद खूपच रंगला. पण शेवटी १९७० च्या दशकात बॅकग्राऊंड मायक्रोवेव्ह नॉईज अमेरिकेतल्या न्यू जर्सीमध्ये सापडला आणि त्यामुळे बिग बँगची थेअरी सिद्ध झाली असं कित्येक वैज्ञानिक मानायला लागले.


प्रत्यक्षात नारळीकरांची थेअरी किती बरोबर आणि किती चूक यापेक्षा त्यांच्या संशोधनाचा स्तर हा आंतरराष्ट्रीय कॉस्मोलॉजीमध्ये किती मोठा होता हे आपल्या लक्षात येईल. आणि एवढ्या मोठ्या माणसाने मराठीवर प्रेम म्हणून मराठीमध्ये अनेक पुस्तके लिहिली. त्यांचे 'आकाशाशी जडले नाते' हे पुस्तक प्रत्येकाने वाचलेच पाहिजे असे आहे. इतक्या सोप्या मराठी भाषेत कॉस्मोलॉजी सामान्यांना कळेल अशा भाषेत सांगणं म्हणजे काही चेष्टा नव्हती. मी किमयागार लिहिताना नारळीकरांमुळे खूपच प्रेरित झालो होतो.


१९७२ साली इंदिरा गांधींच्या आग्रहामुळे नारळीकर भारतात परत आले आणि त्यांनी या देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी खूप मोठी कामगिरी केली याचा मला खूप अभिमान आहे. प्रथम टीआयएफआर आणि नंतर आयुका अशा दोन्ही ठिकाणी त्यांनी अतिशय उत्कृष्ट अध्ययन आणि संशोधन या दोन्ही बाबतीत प्रचंड काम केले. अर्थातच त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण अशा अनेक सन्मानांनी भूषवले यात काही नवल नव्हते. त्यांचा साधेपणा मला नेहमी भावायचा. आयआयटीनंतर एक वर्षभर मुंबईमध्ये मी जी भटकंती केली त्यात टीआयएफआरमध्ये सुद्धा अनेकदा मी जायचो. त्यावेळेला नारळीकर तिथे अनेकदा दिसायचे. मुंबईला आकाशवाणीच्या ऑडिटोरियममध्ये त्यांचे एकदा भाषण होते.


अतिशय शांतपणे बोलणे आणि अवघड संकल्पना सोप्या करून सांगणे हे मला आयुष्यभर खूपच महत्त्वाचे वाटले आहे. कॉस्मोलॉजी आणि गणित यात तर त्यांची मास्टरी होतीच पण त्याशिवाय त्यांना अनेक विषयात रस असायचा. एकदा त्यांचा मला असाच फोन आला. ते म्हणाले "अच्युत, तुझं अर्थात हे पुस्तक आत्ताच वाचून संपवले. अर्थशास्त्रावरती मराठीमध्ये इतकं सोपे आणि सुंदर पुस्तक मी अजून वाचलेले नाही." आणि यानंतर ते बराच वेळ बोलत राहिले. माझा ऊर तर भरून आलाच, पण मला एका गोष्टीचं सतत आश्चर्य वाटत राहीले. एवढा मोठा वैज्ञानिक अर्थशास्त्रसारख्या विषयात रस घेतो, मन लावून ते पुस्तक वाचतो आणि नंतर लेखकाला त्याची दाद आणि पावतीही देतो हे मी कधीही विसरणार नाही.


ज्योतिषाविषयी त्यांची मतं खूप परखड होती. (खरं म्हणजे विवेकानंदांची सुद्धा तेवढीच परखड मतं होती हे कित्येकांना माहीत नसेल. यासाठी दत्तप्रसाद दाभोळकरांचं पुस्तक वाचावं). यामुळे नारळीकरांना श्रद्धांजली जर का द्यायची असेल, तर आपण यापुढे अंधश्रद्धेला बळी पडणार नाही आणि वैज्ञानिक आणि विवेकवादी दृष्टिकोन अंगीकारू अशी आपण शपथ घेतली, तर ती खरी श्रद्धांजली ठरेल.

Comments
Add Comment

प्रेमात हरवलेली माणुसकी

मागोवा-वैष्णवी भोगले प्रेम... हा शब्द उच्चारला की डोळ्यांसमोर विश्वास, आपुलकी, त्याग आणि एकमेकांसाठी जगण्याची

'शुद्धते'चा बुरखा आणि पुरुषी मानसिकतेची झापड

प्रासंगिक-विवेक कांबळे नमध्ये डेटॉलच्या लाँड्री सॅनिटायझरच्या जाहिरातीवरून सध्या वादळ उठलेले आहे. पण, ही केवळ

कन्यादान की जबाबदारीचा अंत?

वेध-सीमा पवार मुलीला "परकी" समजणारी मानसिकता बदलली पाहिजे. कन्यादान म्हणजे मुलीशी असलेले नाते संपणे नाही.

Minister Nitesh Rane : शुभेच्छांचा वर्षाव, पण उत्सव नाही, नितेश राणे यांचा संवेदनशील निर्णय

संभव इंगोले Nitesh Rane Birthday : आज, २३ जून २०२६, महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्ग

जे मनात, तेच ओठांवर...एक बेधडक व्यक्तिमत्त्व : मंत्री नितेश राणे

राजकारणात शब्दांचे खेळ करून सोयीस्कर मुखवटे घालणाऱ्यांची तशी मोठी गर्दी असते; पण या गर्दीत कोणताही मुखवटा न

महाराष्ट्राच्या ‘ब्लू इकॉनॉमी’चा नवा शिल्पकार : नितेश राणे

सुहास शेलार महाराष्ट्राला ८७७ किलोमीटरची विस्तीर्ण आणि समृद्ध किनारपट्टी लाभली असली, तरी प्रदीर्घ काळ तिची ओळख