दहशतवादी हल्ल्याने महाराष्ट्रावर पसरली शोककळा

Share

डोंबिवलीवर शोकसागराचे सावट, पनवेलमध्ये दु:खाचा कल्लोळ तर पुण्यात अश्रूंच्या धारा

मुंबई : काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरन येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून देशासह महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून महाराष्ट्रातील सहा जणांना यामध्ये आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामध्ये डोंबिवलीतील तीन जणांचा, पनवेलमधील एकाचा तर पुण्यातील दोन जणांचा समावेश आहे. डोंबिवली परिसरावर दिवसभर शोकसागराचे सावट असून पनवेलमध्ये दु:खाचा कल्लोळ उठला आहे. दोघा पुणेकरांच्या मृत्यूने पुणे शहरामध्ये रडारडीचे चित्र असून अश्रूंच्या धारा वाहत असल्याचे दिवसभरात दिसून आले.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात आता त्यांचे मृतदेह आणण्यात आले असून यातील मृतक दिलीप देसले यांचे मृतदेह पनवेल येथे त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. यावेळी कुटुंबीयांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. याचसोबत डोंबिवली येथील संजय लेले यांचे पार्थिव देखील महाराष्ट्रात आणण्यात आले आहे. यावेळी मंत्री आशिष शेलार तसेच भाजपचे नेते रवींद्र चव्हाण उपस्थित होते.

डोंबिवली येथील संजय लेले आणि पनवेल येथील दिलीप देसले यांचे पार्थिव मुंबई विमानतळावर आणण्यात आले. महाराष्ट्र सरकारतर्फे त्यांच्या नातेवाईकांची विमानतळावर भेट घेऊन सांत्वन केले. तसेच दिलीप देसले आणि संजय लेले यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली, अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली आहे.

पनवेल येथील मृतक दिलीप देसले यांच्या निवासस्थानी मोठा पोलिस बंदोबस्त करण्यात आला होता. तसेच या ठिकाणी आता शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे दिलीप देसले यांच्या अंत्यविधीसाठी दाखल झाले होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे श्रीनगरसाठी रवाना झाले आहेत. शिंदे हे रात्री ८ वाजता श्रीनगरला पोहोचले. काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्याची जबाबदारी एकनाथ शिंदे पार पाडणार आहेत.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राज्यातील अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. या आधी खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांची एक टीम काश्मीरला गेली होती. काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचा सर्व खर्च राज्य सरकार करणार आहे. एकनाथ शिंदे हे सातत्याने काश्मीरमधील पर्यटकांच्या संपर्कात आहेत.

दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील तिघांचा मृत्यू

काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरन येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ला डोंबिवलीसाठी एक काळा दिवस ठरला आहे. या भ्याड हल्ल्यात डोंबिवलीतील तीन तरुणांचा मृत्यू झाला असून, त्यांच्यासोबत गेलेल्या कुटुंबीयांनी मृत्यूला डोळ्यांसमोर पाहिले. या हल्ल्यात डोंबिवलीतील संजय लक्ष्मण लेले (वय ५२), हेमंत जोशी (वय ४३) आणि अतुल मोने (वय ४४) यांचा मृत्यू झाला आहे. ते तिघेही आपल्या कुटुंबासह काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेले होते. हल्ल्यात संजय लेले यांचा मुलगा हर्षल लेले (वय २०) किरकोळ जखमी झाला असून त्याच्या बोटाला गोळी लागली आहे. मात्र, अत्यंत धीराने त्याने संपूर्ण संकटाचा सामना करत कुटुंबीयांना सावरण्याचे काम केले आहे. संजय लेले यांची पत्नी कविता, अतुल मोने यांची पत्नी अनुष्का आणि त्यांची १६ वर्षांची मुलगी रुचा, तसेच हेमंत जोशी यांची पत्नी मोनिका व त्यांचा १५ वर्षांचा मुलगा ध्रुव हे सर्वजण सुखरूप आहेत.

या घटनेनंतर डोंबिवली शहरात शोककळा पसरली असून नवापाडा, भागशाळा मैदान आणि ठाकूरवाडी या तीन वेगवेगळ्या भागांतील नागरिक या घटनेने हादरून गेले आहेत.

मुंबईत सतर्कतेचा इशारा

जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यांतील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि दिल्लीत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पोलीस आयुक्तांनी सर्वच पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना परिसरात गस्तीसह नाकाबंदी करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्वत्र पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आले आहे. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा आणि एटीएसला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. मंत्रालय, विधानसभेसह सर्वच शासकीय आणि निमशासकीय कार्यालय, धार्मिक स्थळे, संवेदनशील ठिकाणी विशेषता पयर्टन स्थळावर अधिक पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे आदेश दिले आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत विविध हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊसमध्ये पोलिसांनी अचानक कोम्बिंग ऑपरेशन हाती घेतले होते. संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरु केली होती. बंदोबस्तात हलर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. शहरातील संवेदनशील व अतिसंवदेनशील परिसरातील बंदोबस्तात अधिक वाढ करण्यात आली आहे.

दहशतवादी हल्ल्यात पनवेलमधील दिलीप देसले मृत्युमुखी

जम्मू काश्मीर येथील पहेलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात नविन पनवेल सेक्टर १२ येथील दिलीप देसले मृत्युमुखी झाले आहेत. तर कामोठे येथील सुबोध पाटील आणि माणिक पाटील हे पती-पत्नी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना श्रीनगर येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती ठीकठाक आहे. तर कामोठेमधील माणिक पाटील आणि त्यांच्या पत्नी सुबोध पाटील या जखमी झाल्या आहेत.

आयपीएलच्या खेळाडूंनी वाहिली श्रद्धाजंली

पहलगाम, जम्मू आणि काश्मीर येथील बायसरण मेडो येथे झालेल्या या हल्ल्यातील मृतांना आयपीएलमधील बुधवारी झालेल्या आजच्या सामन्यात दोन्ही संघांचे खेळाडू व अम्पायर हातावर काळी फित बांधून मृत पावल्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. आजच्या सामन्यात फटाक्यांची आतषबाजी होणार नाही आणि चिअरलीडर्सही नाचणार नसल्याचे बीसीसीआयने जाहीर केले. हार्दिक पांड्या म्हणाला, दहशतवादी हल्ल्यातील बळींना मी माझ्या संवेदना व्यक्त करू इच्छितो. तेच पॅट कमिन्स म्हणाला, आमच्यासाठीही हे हृदयद्रावक आहे, आमच्या संवेदना बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत.

कुलगाममधील चकमकीत पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने जोरदार मोहिम राबवण्यास सुरुवात केली आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर कुलगाममध्ये मोठी लष्करी कारवाई करण्यात आली आहे. कुलगाम येथे भारतीय सैन्याने टीआरएफ कमांडरला घेरले आहे. कुलगाममधील तनमार्गमध्ये टीआरएफ कमांडरला घेरण्यात आलं असून चोरदार चकमक सुरू आहे. गेल्या दहा तासांमध्ये जम्मू काश्मीरमधील ही दुसरी चकमक आहे. सकाळी बारामुल्ला येथे दोन घुसखोरांना कंठस्नान घालण्यात आलं होतं. त्यानंतर आता कुलगाममध्ये मोठी कारवाई सुरु आहे.

मंगळवारी पहलगाममध्ये टीआरएफच्या दहशतवाद्यांनी गोळीबार करुन २६ जणांची हत्या केली होती. त्यानंतर आता दक्षिण काश्मीरमधील कुलगाममध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली आहे. बुधवारी संध्याकाळी सुरक्षा दलांनी तंगमार्ग परिसरात टीआरएफच्या दहशतवाद्यांना घेरले. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. जम्मू-काश्मीर पोलिस, भारतीय लष्कर आणि सीआरपीएफकडून ही कारवाई करण्यात येत आहे. घटनास्थळी अतिरिक्त सुरक्षा दल पाठवण्यात आले आहे. टीआरएफने पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

दहशतवादी हल्ल्यात भारतमातेच्या नेव्ही, आयबी, वायू दलातील तीन सुपुत्रांना वीरगती

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात नेव्ही दलातील लेफ्टनंट विनय नरवाल यांना दहतवाद्यांनी भेळपुरी खात असताना ठार मारले. इंटेलिजन्स ब्युरोमधील अधिकारी मनिष रंजन आणि भारतीय वायू सेनेतील अधिकारी कॉरपोरेल टेज हॅलियांग यांनाही वीरगती प्राप्त झाली आहे. भारत देशाच्या सुरक्षा यंत्रणात कार्यतत्पर असलेले हे तीन अधिकारी आपल्या कुटुंबीयांसमवेत पर्यटनासाठी काश्मीरला गेले होते. मात्र, दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात त्यांना वीरगती प्रात झाली असून बुधवारी त्यांना मानवंदना देण्यात आली.

बिहारच्या रोहतास जिल्ह्याच्या आरोही गावातील रहिवाशी असलेले मनिष हे इंटेलिजन्स ब्युरोमध्ये कार्यरत होते. सध्या हैदराबादत येथे त्यांची पोस्टींग होती. आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह ते पर्यटनासाठी काश्मीरला पोहोचले होते. मात्र, त्यांचा हाच काश्मीर दौरा त्यांच्या आयुष्यात काळ बनून आला. विशेष म्हणजे कुटुंबातील इतर सदस्य देखील त्यांच्यासमवेत फिरायला सोबत जाणार होते. पण, स्वास्थ अस्वस्थेच्या कारणास्तव त्यांनी जाणे टाळले. मनिष हे कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ असून त्यांचे दोन भाऊ देखील सरकारी नोकरीत कार्यरत आहेत.

लेफ्टनंट नरवाल विनय यांचा मृत्यू

हरियाणाच्या करनाल येथील मूळचे रहिवाशी असलेल्या आणि नौदलात लेफ्टनंट असलेल्या विनय नरवाला यांचे सात दिवसांपूर्वी १६ एप्रिल रोजी लग्न झाले होते. विनय नरवाल आणि त्यांची पत्नी हिमांशी हनिमूनसाठी फिरायला गेले होते. काश्मीरमधील पहलागाम येथे हे नवदाम्पत्य भेळपुरी खात असताना अतिरेक्यांनी विनय नरवाल यांना गोळ्या घातल्या. त्यामध्ये, विनय यांचा जागीच मृत्यू झाला, त्यावेळी मृत पतीच्या पार्थिवाजवळ बसून नवविवाहिता हिमांशी टाफो फोडत होती. हिमांशीचा व्हिडिओ आणि तिचा पतीच्या पार्थिवाजवळ बसलेला फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. त्यानंतर, देशभरात संताप व्यक्त केला जातोय. हाती लग्नातला चुडा भरलेला, ७ दिवसांपूर्वीचा आनंद दु:खाच्या शोकसागरात बुडाला आणि खिन्न मनाने ती मृत पतीच्या शेजारी बसल्याचे दिसून आले.

नौदलाकडून मानवंदना

भारतीय नौदलाचे लेफ्टनंट विनय नरवाल यांना नौदलाकडून मानवंदना देण्यात आली. त्यावेळी, विनय यांच्या पत्नीने आपल्या पतीच्या पार्थिवाला सॅल्यूट करत मानवंदना दिली. आय एम प्राऊड ऑफ यू विनय इव्हरीटाईम जय हिंद. असे म्हणत विनयच्या पत्नीने डोळ्यातून अश्रूंना वाट मोकळी केली. आपल्या वीरगती प्राप्त केलेल्या पतीच्या मृतदेहासमोर ७ दिवसांच्या विधवेने टाहो फोडल्यानंतर उपस्थितांच्या डोळ्यातही अश्रू तरळले होते.

वायू सेनेचे कॉर्पोरल टेज हॅलियांग यांना वीरगती

भारतीय वायूसेनेचे कॉर्पोरल अधिकारी टेज हॅलियांग हे अरुणाचल प्रदेशच्या लोअर सुबनसिरी जिल्ह्यातील ताजांग गांवचे मूळ रहिवाशी आहेत. श्रीनगर येथील एअरबेसवर ते तैनात होते. सुट्टी घेऊन आपल्या पत्नीसमवेत ते फिरायला पहलगाम येथे आले होते. विशेष म्हणजे हेलियांग यांचेही नुकतेच लग्न झाले होते. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात त्यांना देखील वीरमरण आलं आहे. अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी ट्विट करुन त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलं आहे. तसेच, संपूर्ण देश त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं. दरम्यान, सुदैवाने या हल्ल्यात त्यांची पत्नी बचावली, पण त्यांना मानिसक धक्का बसला आहे.

पुणे कोंढव्यातील ३५ जण काश्मीरमध्ये सुखरुप

जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेले कोंढव्यातील साईनगर भागातील ३५ जण सुखरुप असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. एकूण १७ दाम्पत्य आणि एक वृद्ध महिला असे हे ३५ जण शुक्रवारी पुण्यातून काश्मीरला रेल्वेने रवाना झाले होते. हल्ल्याच्या एकदिवस आधी म्हणजेच सोमवारी ते घटनास्थळी होते. हल्ला झाल्याच्या सकाळी लवकर ते तिथून निघाले आणि दुपारी हा हल्ला झाला. त्यानंतर ते त्याच दिवशी श्रीनगर येथे पोहोचून त्याठिकाणी मुक्कामी होते. पुण्यातील खासदार आणि केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे त्यांच्या संपर्कात असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. या सर्व व्यक्तींचे मोबाईल बंद आहेत. परंतु त्यांनी नातेवाईकांशी संपर्क केला असता ते सुखरुप असल्याचे कळविण्यात आले आहे. संतोष गर्जे, मंगल गर्जे, दत्ता घोडके, वंदना घोडके, अनिल जाधव, आशा जाधव, वाणी दाम्पत्य, गणेश डोंगरे, शोभा डोंगरे, ब्रम्हदेव शिंदे, उर्मिला शिंदे आदीसह एकूण ३५ जणांचा हा ग्रुप असल्याची माहिती दत्ता घोडके यांचे बंधू संजय घोडके यांनी दिली.

ठाण्यातील ३७ पर्यटक सुरक्षित

ठाणे जिल्ह्यातील काही पर्यटक जम्मू-काश्मीरमध्ये अडकले आहेत. जिल्ह्यातील ४० पर्यटक पहलगाम येथे होते. या हल्ल्यात डोंबिवली शहरातील नवापाडा, पांडुरंग वाडी आणि नांदिवली परिसरात राहणाऱ्या हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने या तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. इतर ३७ पर्यटक सुरक्षित आहेत. मृतांच्या नातेवाईकांना सर्व प्रकारची मदत केली जात आहे.

Recent Posts

कोकणातील तरुणाची वेगळी वाट…

माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…

36 minutes ago

छोड आये हम वो गलियाँ…

वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…

1 hour ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २४ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…

2 hours ago

पहलगाममधील नरसंहार, हिंदू पर्यटकांना टार्गेट

भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…

2 hours ago

SRH vs MI, IPL 2025: हैदराबादला हरवत मुंबईचा विजयी चौकार

हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…

3 hours ago

अटारी बंद, व्हिसा रद्द, सिंधू करार बासनात, पाकिस्तानच्या विरोधात ५ मोठे निर्णय

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…

3 hours ago