अहमदाबाद : अहमदाबादजवळील बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या ठिकाणी रविवारी (दि. २३) रात्री झालेल्या अपघातामुळे जवळच्या रेल्वे मार्गावर परिणाम झाला, ज्यामुळे अनेक गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली आहे तर अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, तसेच संरचनेचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन (एनएचएसआरसीएल) ने सांगितले.
Several trains on Western Railway affected as gantry of bullet train work falls on overhead wires at Ahmedabad. No injuries. pic.twitter.com/eqsQd3qYEG
— Rajendra B. Aklekar (@rajtoday) March 24, 2025
मिळालेल्या माहितीनुसार, २३ मार्च रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास, वटवा (अहमदाबादजवळ) येथे व्हायाडक्ट बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या सेगमेंटल लाँचिंग गॅन्ट्रीपैकी एक काँक्रीट गर्डरचे लाँचिंग पूर्ण झाल्यानंतर मागे हटत होती ते चुकून जागेवरून घसरले असे एनएचएसआरसीएलने एका निवेदनात म्हटले आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, तसेच संरचनेचे कोणतेही नुकसान झाले नाही असेही म्हटले आहे.तथापि, या घटनेमुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला, ज्यामुळे किमान २५ गाड्या रद्द करण्यात आल्या, तर १५ इतर अंशतः रद्द करण्यात आल्या, पाच गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आणि सहा गाड्या वळवण्यात आल्या. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, बाधित मार्गावर गाड्यांची वाहतूक सुलभ करण्यासाठी रेल्वे मार्ग मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एनएचएसआरसीएलच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, रोड क्रेनच्या मदतीने पुनर्संचयित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या अपघातामुळे रद्द केलेल्या गाड्यांमध्ये वटवा-बोरिवली एक्सप्रेस, अहमदाबाद-मुंबई सेंट्रल एक्सप्रेस, वडोदरा-वटवा इंटरसिटी, अहमदाबाद-वलसाड गुजरात क्वीन, जामनगर-वडोदरा इंटरसिटी, वडनगर-वलसाड-वडनगर एक्सप्रेस आणि वटवा-आनंद मेमू यांचा समावेश आहे. अहमदाबाद-एमजीआर चेन्नई सेंट्रल हमसफर एक्सप्रेस, राजकोट-सिकंदराबाद एक्सप्रेस आणि इतर काही गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले. रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रवाशांसाठी एक हेल्पलाइन नंबरही जारी केला.