मुंबई : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत (Prime Minister Housing Scheme) ऑनलाईन सर्वेक्षणात मंजूर करण्यात आलेली घरकुले अपात्र ठरली असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पक्की घरे असताना घरकुलांचा लाभ देण्यात आला असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर ग्रामसेवकाने केलेल्या चौकशीत तालुक्यातील गेगाव येथील ७६ मंजूर घरकुल लाभार्थ्यांपैकी तब्बल ६० लाभार्थ्यांची घरकुल अपात्र ठरली आहेत. मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांच्या अपात्रतेमुळे ऑनलाईन सर्वेक्षणावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शहापुर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत विभागातील विस्तार अधिकाऱ्यांमार्फत गेगाव येथील मंजूर असलेल्या घरकुल लाभार्थ्यांची फेर चौकशी सुरू केली आहे.
Samruddhi Highway Toll : समृद्धी महामार्गावरील प्रवास महागला!
केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत २०१८ मध्ये आवास प्लस या अॅपच्या माध्यमातून घरकुल लाभार्थ्यांचे ऑनलाईन सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणात शहापूर तालुक्यातील गेगाव येथील ७६ लाभार्थ्यांची घरकुले मंजूर झाली होती. याबाबत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना २०२० मध्ये झालेल्या ग्रामसभेत मान्यता देण्यात आल्यानंतर २०२४ – २५ मध्ये लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी केंद्रास्तरावरून लक्षांक प्राप्त झाला. मात्र मार्च २०२४ मध्ये गेगाव येथील एका दक्ष नागरिकाने घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांची पक्की घरे असताना त्यांना घरकुलांचा लाभ देण्यात येत असून याची चौकशी व्हावी अशी तक्रार शहापुर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे व मुख्यमंत्री पोर्टलवर केली. याची दखल घेत गेगाव ग्रामसेवकाने केलेल्या चौकशीत मंजूर झालेल्या ७६ घरकुलांपैकी तब्बल ६० घरकुले अपात्र ठरवली आहेत. या संदर्भात गटविकास अधिकाऱ्यांनी घरकुल लाभार्थ्यांची फेर चौकशी सुरू केली असून यामध्ये काय निष्पन्न होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.