Monday, March 24, 2025
Homeताज्या घडामोडीज्ञानेश्वर माऊलींच्या लाडक्या बहिणीची चरित्रकथा ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ सिनेमातून उलगडणार

ज्ञानेश्वर माऊलींच्या लाडक्या बहिणीची चरित्रकथा ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ सिनेमातून उलगडणार

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या भूमिकेत तेजस बर्वे

मुंबई: अध्यात्म, ज्ञान आणि भक्तीचा संगम म्हणजे कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली. वारकरी संप्रदायात त्यांचे स्थान अनन्यसाधारण आहे. भक्तीमार्गातील त्यांचे योगदान अनमोल असून हरिपाठातील अभंग आजही प्रेरणा देतात. ज्ञानेश्वर माउलींनी आळंदी येथे समाधी घेतली, परंतु त्यांची माणूसधर्माची विचारधारा अजरामर आहे. संत ज्ञानेश्वरांनी समाजाला समता, मानवता आणि प्रेम यांचा मार्ग दाखवला. त्यांचा संदेश आजही लाखो भक्तांच्या जीवनाचा आधार आहे. त्यांच्या शिकवणीतून अखंड माणुसकीचा, करुणेचा झरा वाहतो म्हणून त्यांना ‘माऊली’ असे संबोधले जाते.

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ असलेल्या माऊलींनी मराठी भाषेत ‘भावार्थदीपिका’ अर्थात ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथ लिहून वेद-उपनिषदांचे गूढ सामान्यजनांसाठी उलगडले. त्यांनी ‘अमृतानुभव’ ग्रंथातून जीवनाचे तत्त्वज्ञान मांडले. त्यांच्या ओवीबद्ध लेखनशैलीत सहजता असूनही त्यात गहन आध्यात्मिक अर्थ आहे. अशा या माऊली ज्ञानेश्वरांच्या लाडक्या बहिणीची चरित्रकथा येत्या १८ एप्रिलपासून ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटातून उलगडणार आहे. दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती रेश्मा कुंदन थडानी यांनी केली असून प्रस्तुती ए.ए.फिल्म्स ही नामांकित वितरण संस्था करीत आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांची जनमानसाच्या काळजात घर करणारी भूमिका या चित्रपटात तेजस बर्वे हा गुणी कलाकार साकारणार आहे. मराठी रंगभूमीची पार्श्वभूमी असलेला तेजस गेली अनेक वर्षे मराठी रंगभूमी, मालिका आणि चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहे. माऊलींच्या रुपात तेजसने आळंदीच्या समाधी मंदिराच्या गाभार्‍यातून प्रांगणात प्रवेश केला तेव्हा प्रत्यक्ष माऊली मंदिरात अवतरल्याचा भास झाला, असे अनेकांनी म्हटले. ‘अव्यक्त आकार आकारले रूप । प्रकाशस्वरूप बिंबलेसे ।। असा आनंदानुभव उपस्थितांनी घेतला. कित्येक भाविक त्याला पाहून गहिवरले, कित्येकांना त्याच्या पायी वंदन केल्याशिवाय राहावले नाही. केवळ माऊलींसारखे दिसणेच नव्हे तर माऊलींचे असणेही वाटावे यासाठी, या चित्रपटात माऊली साकारण्यासाठी तेजसने प्रचंड अभ्यास आणि मेहनत केली आहे. संत ज्ञानेश्वर आणि मुक्ताबाई यांच्यातील हृद्य भावाबहिणीचे नाते ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटात आपल्याला अनुभवता येणार आहे.

संगीताची जबाबदारी अवधूत गांधी, देवदत्त बाजी यांनी सांभाळली आहे. छायांकन संदीप शिंदे तर संकलन सागर शिंदे, विनय शिंदे यांचे आहे. कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज तर ड्रोन आणि स्थिरछायाचित्रण प्रथमेश अवसरे यांचे आहे. रंगभूषेची जबाबदारी अतुल मस्के तर वेशभूषेची जबाबदारी सौरभ कांबळे यांनी सांभाळली आहे. नृत्यदिग्दर्शन किरण बोरकर तर ध्वनीआरेखन निखिल लांजेकर यांचे आहे. पार्श्वसंगीत शंतनू पांडे यांनी दिले आहे. साहसदृश्ये बब्बू खन्ना यांची आहेत. सहनिर्माते सनी बक्षी आहेत. केतकी गद्रे अभ्यंकर कार्यकारी निर्मात्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -