Tumbadchi Manjula Trailer : रहस्य आणि कॉमेडीचा भन्नाट तडका असलेल्या ‘तुंबाडची मंजुळा’चा ट्रेलर प्रदर्शित
May 21, 2026 05:34 PM
Tumbadchi Manjula
सध्या सर्वत्र चर्चेचा विषय असलेला ,आपल्या पोस्टर, टिझर आणि गाण्यांमधून प्रचंड उत्सुकता निर्माण केलेल्या झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या तुंबाडची मंजुळा या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला असून त्यातून या चित्रपटाबद्दलची उत्कंठा अजूनच जास्त वाढली आहे. रहस्य, भीती , गुढता आणि त्याच्या सोबतीला एकाहून एक अतरंगी गावकऱ्यांची धमाल गोष्ट या ट्रेलरमधून बघायला मिळत असल्याने एक परिपूर्ण मनोरंजक चित्रपटाची मेजवानी मिळणार असल्याची चर्चा प्रेक्षक सोशल मीडियावर करत आहेत.
दिग्दर्शक विविध कोरेगांवकर म्हणतात, ''करीअरच्या सुरुवातीलाच एवढ्या मोठ्या चित्रपटाचं दिग्दर्शन करायची संधी मिळणं ही माझ्यासाठी अत्यंत मोठी गोष्ट आहे. झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर यांनी माझ्यावर विश्वास टाकत ही संधी मला दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. हा चित्रपट प्रेक्षकांना एका वेगळ्या आणि अनोख्या विश्वात घेऊन जाणारा अनुभव आहे. हा चित्रपट तयार करताना आम्ही प्रत्येक पात्र, त्याची शैली आणि प्रत्येक प्रसंग वेगळ्या पद्धतीने उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. ट्रेलरमधून आम्ही एक छोटीशी झलक दाखवली आहे. 'तुंबाडची मंजुळा' प्रेक्षकांना नक्की आवडेल, याची आम्हाला खात्री आहे.''
रहस्य, विनोद आणि दमदार कथानकाची मेजवानी घेऊन येणारा ‘तुंबाडची मंजुळा’ हा चित्रपट आता ५ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. विविध कोरगांवकर दिग्दर्शित या चित्रपटाची कथा आणि लेखन ऋषिकेश तुरई यांनी केले असून झी स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी केली आहे.