महसूल विभागाच्या ‘तडीपार’ प्रस्तावास उपविभागीय दंडाधिकाऱ्यांची मंजुरी
बीड : जिल्ह्यातील शिरुर कासार येथील मारहाणीच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सतिश उर्फ खोक्या भोसलेचे अनेक कारनामे समोर आले आहेत. पैशांची उधळण, हेलिकॉप्टर सवारी आणि वेगवेगळ्या रील्समधून खोक्याचे प्रकरण समोर आल्यानंतर वन विभाग आणि बीड पोलीसही खोक्याचा शोध घेत होते. ढाकणे पिता-पुत्रांना अमानुष मारहाण तसेच मुजोरी वृत्तीमुळे गेल्या सहा दिवसांपासून फरार असलेला सतिश उर्फ खोक्या भोसले अखेर पोलिसांच्या हाती सापडला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिस स्टेशन शेवटपर्यंत खोक्याचा पाठलाग करीत होते. प्रयागराज मधून अखेर त्याच्या पोलिसांकडून मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
पोलिसांकडे सध्या खोक्या भोसलेच्या विरूद्ध तीन गुन्हे दाखल आहेत, बीड ते प्रयागराज त्याने बसमधून प्रवास केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. लोकल कोर्टाकडून ट्रान्जिट रिमांड मिळाल्यानंतर खोक्याला बीडमध्ये आणण्यात येईल, असं बीडचे एसपी नवनीत कॉवत यांच्याकडून सांगण्यात आले आहे.पोलिसांनी त्याच्या हद्दपारीसाठी महसूल विभागाला दिलेल्या प्रस्तावाला उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे मान्यता दिली आहे. त्यामुळे, आता खोक्याची बीड जिल्ह्यातून हद्दपारी निश्चित झाली आहे.
MPSC पदभरती आणि पेपरफुटी, कॉपी, गुणांच्या पारदर्शकतेवर विधानपरिषदेत चर्चा
एका व्यक्तीला बॅटने मारहाण, वाहनांत नोटांचे बंडलची ठेवाठेव, तसेच सोफ्यावर बसून नोटांचे बंडल जुळवण्यासह शाळेत भाषण देताना पाय मोडण्याची भाषा करणारे सतीश भोसले उर्फ खोक्याचे व्हिडीओ समोर आले होते. भाजपच्या भटक्या विमुक्त आघाडीचा पदाधिकारी असलेला सतीश भोसले उर्फ खोक्या भाजप आमदार सुरेश धस यांचा समर्थक असल्याने धसांवरही चोहेबाजूने टिका झाली. अलिकडे बॅटने मारहाणीच्या घटनेवरुन खुद्द पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून दिलीप ढाकणे यांचे दात पाडल्यावरुनही त्याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. वन विभागाच्या छाप्यात त्याच्या घरी शिकारीचे साहित्य आणि गांजा आढळल्याने हा देखील गुन्हा नोंद झाला. त्याच्या अटकेसाठी शिरुर बंद करुन मोर्चाही काढण्यात आला होता.
बीड जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई
खोक्यावर शिरुर कासार, पाटोदा, अंमळनेर पोलिस ठाण्यात यापूर्वीही गुन्हे नोंद होते. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या खोक्या भोसलेवर हद्दपारीची कारवाई करण्याबाबत पोलिसांनी त्याच्यावर हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर केला होता. बीडच्या उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. सतीश भोसले उर्फ खोक्याची बीड जिल्ह्यातून हद्दपारी करण्यात आली आहे. याबाबचे पत्र शिरुर कासार पोलिसांना देण्यात आले. त्यामुळे, उत्तर प्रदेशच्या दिशेने पळून गेलेला खोक्या आता बीड जिल्ह्यातून हद्दपार असणार आहे.