Friday, March 28, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखभिकारी, भुरटे, गर्दुल्ले, फेरीवाले...…

भिकारी, भुरटे, गर्दुल्ले, फेरीवाले……

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर

नवे सरकार स्थापन झाल्यावर कोणती खाती कोणा मंत्र्याला मिळणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांना असते. गृह आणि परिवहन या दोन खात्यांचा थेट जनतेशी संबंध येतो. गृह म्हणजे पोलीस आणि परिवहन म्हणजे लालपरी, असे समीकरण आहे. पोलीस व एसटीचे कर्मचारी गणवेषात असतात. त्यांच्याकडून जनतेच्या मोठ्या अपेक्षा असतात. या खात्यांभोवती घुटमळणाऱ्या मध्यस्थांचा वावर मोठा असतो. विकासाप्रमाणेच जनतेला सुरक्षा सर्वात जास्त महत्त्वाची आहे याचा कधी कधी प्रशासनाला विसर पडतो. हत्या, अपहरण, अत्याचार, बलात्कार, खंडणी, लुटमार, दरोडे यांसारख्या घटना वाढल्या किंवा सेलिब्रिटींना त्याची झळ पोहोचली की सखोल चौकशीचे आदेश दिले जातात, सीआयडी वा एसआयटी नेमली जाते आणि घटनेचे राजकारण करू नका असे विरोधकांना आवाहन केले जाते.

बीड आणि परळीच्या घटनांनी सारा महाराष्ट्र हादरला. एकाचे अपहरण करून, त्याचा क्रूर छळ करून त्याची हत्या करण्यात आली, तर दुसऱ्याचा जेलमध्ये असताना मारहाणीनंतर मृत्यू झाला. या दोन घटनांवरून गेले दोन-अडीच महिने राज्यात वादळ उठलेले असतानाच पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला. पुण्यात पुणे रेल्वे स्टेशन, शिवाजी नगर, स्वारगेट आणि पिंपरी-चिंचवड अशी चार मोठी एसटीची बस स्थानके आहेत. राज्यात एसटीचे सुमारे अडिचशे डेपो आहेत. एसटी बस म्हणजेच लालपरी ही राज्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखळी जाते. एअर कंडिशन्ड शिवनेरी, शिवशाही, हिरकणी आणि लालपरी या बसेसमधून राज्यात रोज ५८ लाखांपेक्षा जास्त लोक प्रवास करीत असतात. राज्यातील प्रत्येक गावाला जोडणारी बस ही मराठी जनतेच्या जीवनाचा अविभाज्य अंग आहे. ग्रामीण भागात विशेषत: तालुक्याच्या ठिकाणी शाळा-कॉलेजची लक्षावधी मुले-मुली रोज लालपरीतूच ये-जा करीत असतात. गाव तिथे एसटी हे तर महामंडळाचे ब्रीद वाक्य आहे. एसटी बसनेच मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती अशा मोठ्या शहरांना गावागावांशी जोडले आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या कोकणपट्टीचे जनजीवन लालपरीवरचं अवलंबून आहे.

एसटी बस हा महाराष्ट्रातील जनतेच्या जीवनाचा अविभाज्य भाग असताना पुण्यात स्वारगेट बस स्थानकावरील डेपोत उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये पहाटेच्या वेळी अंधार असताना एका तरुणीवर बलात्कार होतो व नंतर तो नराधम तेथून पलायन करतो, पोलिसांना घाबरून उसाच्या फडात लपून बसतो, हे सर्व भयानक आहे. राज्यातील प्रत्येक घरांत या घटनेने हादरा बसला आहे. एसटीच्या बसमध्ये अशी घटना होतेच कशी? स्वारगेट स्थानक हे सदैव प्रवाशांच्या गर्दीने गजबजलेले असते. रोज एक लाखांहून प्रवाशांची वाहतूक येथून होत असते. दिवस-रात्र बसेसची ये-जा असते. एसटी स्थानकावर सुरक्षा रक्षक असतात. एसटीचे कर्मचारी गणवेशात फिरत असतात. स्वारगेट एसटी स्थानकाच्या समोरच पोलीस चौकी आहे. बाहेर दोन्ही बाजूंनी जाणारी रस्त्यांवर वाहनांची रात्रीसुद्धा मोठी ये-जा असते. रिक्षांनी तर हे स्थानक नेहमी वेढलेले असते. मग अशा ठिकाणी एका तरुणीवर बसमध्ये बलात्कार होतो, या घटनेला जबाबदार कोण? या घटनेनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चौकशीचे आदेश दिले. एसटीच्या सुरक्षिततेविषयी मुंबईत तातडीने बैठक बोलावली. लालपरीमध्ये सीसीटीव्ही बसवणार असल्याची घोषणा झाली. स्वारगेट एसटी स्थानकावरील सर्व २३ सुरक्षा रक्षकांना निलंबित करण्यात आले. राज्यात तीस एसटी बस स्थानकांची व डेपोची अवस्था काय आहे, त्यात तातडीने सुधारणा काय केली पाहिजे याची महामंडळाला माहिती नाही असे कसे म्हणता येईल? एसटी डेपोंच्या जागांचा विकास करण्याअगोदर स्वच्छता आणि सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे, असे महामंडळाला वाटत नाही का? एसटी महामंडळाकडे जवळपास ८८ हजार कर्मचारी आहेत. रोज १४५०० बसेस रस्त्यावरून धावत असतात. प्रवाशांचा भार सतत वाढत आहे. तिकिटात ५० टक्के सवलत दिल्याने लाडक्या बहिणी व ज्येष्ठ नागरिकांची प्रवासी संख्या लक्षणीय वाढली आहे. मंडळाचा व्याप आणि विस्तार लक्षात घेता कर्मचारी संख्या कमी आहे. एसटीच्या अनेक सेवा खासगी कंत्राटदारांकडे सोपविण्याचा कल वाढतो आहे. राज्यात एसटीने सत्तावीसशे सुरक्षा रक्षकांना मंजुरी दिली आहे. प्रत्यक्षात बावीसशे असावेत. त्यातही खासगी सुरक्षा रक्षकांची संख्या वाढत आहे. त्या सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षण दिलेले आहे का? त्यांचे शिक्षण किती आहे? त्यांना अशा कामाची आवड आहे की दुसरे काम मिळत नाही म्हणून ते सुरक्षा रक्षक झाले आहेत? सुरक्षा रक्षक म्हणून त्यांचे वय, प्रकृती व क्षमता चांगली आहे काय? या सर्व किमान निकषांची तपासणी होते का? निवृत्ती लष्करी जवान एसटीकडे सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीला का येत नाहीत? राज्यातील एसटी स्थानके म्हणजे आवो जावो, घर तुम्हारा अशी अवस्था आहे. एसटी स्थानकांचे दरवाजे २४ तास उघडे असतात. धर्मशाळेप्रमाणे तिथे प्रवाशांशिवाय अन्य कोणीही ये-जा करीत असतात. भिकारी, गर्दुल्ले, दारूडे, फेरीवाले, एजंट यांचा वेढा एसटी स्थानकांना पडलेला असतो. रिक्षा, दुचाकी किंवा चारचाकी वाहने एसटी स्थानकाच्या आवारात मुक्तपणे फिरत असतात. थेट एसटी बसपर्यंत प्रवाशांना सोडण्यासाठी रिक्षा किंवा दुचाकी येत असतात. एसटी स्थानकांवरील स्वच्छतागृहे म्हणजे गलिच्छ असतातच पण तेथील घाणेरड्या वासाने अनेक स्त्री – पुरुष तेथे जाण्याचे धाडसही करीत नाहीत.

स्वच्छतागृहात नळाला पाणी नसते किंवा थेंब थेंब येते. रोज लक्षावधी प्रवाशांचा वावर असलेल्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनसवर आणि चर्चगेट स्थानकावरील स्वच्छतागृहात स्वच्छता काटेकोरपणे पाळली जाते, तसे एसटी स्थानकांवर का होऊ शकत नाही? बहुसंख्य स्थानकांवर धुळीचे साम्राज्य आहे हे सुद्धा महामंडळाला सांगावे लागणार का? शिवसेनेचे दिवंगत नेते प्रमोद नवलकर हे परिवहन मंत्री होते. त्यांनी मुंबई सेंट्रल एसटी मध्यवर्ती स्थानकावरील गर्दी व स्वच्छता यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाय योजले होते. त्यांच्या काळात मुंबई सेंट्रलवर प्रवेशासाठी एक रुपया तिकीट आकारले होते. नंतर सुलभ स्वच्छतागृह आले. काही काळाने निर्बंध पुन्हा सैल झाले. एसटी स्थानकांवर कोणीही येतो व स्वच्छतागृहाचा वापर करून निघून जातो, असे सर्वत्र आहे. अनेक भिकारी, गर्दुल्ले, समाजकंटक हे एसटी स्थानकावर मुक्काम करतात, स्वच्छतागृहाचा वापर करून दिवसभर इतर उद्योग करीत असतात. एसटी स्थानकावर मिळेल तिथे शेडवर, पत्र्यावर कसली ना कसली बोचकी-पिशव्या, सामान ठेवलेले दिसते. त्यात काय आहे हे कुणाला ठाऊक नसते. फेरीवाले, खाद्य पदार्थ विक्रेते, पाण्याच्या बाटल्या व थंडपेये विकणारे बसमध्ये फिरताना दिसतात. त्यावर कुणाचे नियंत्रण नसते. स्थानकाच्या आवाराला लागूनच खाद्यपदार्थ, भाज्या, फळे, चहा, भजी, वडा पाव, कपड्यांपासून सर्व गाड्या लागलेल्या असतात. त्यांचे मालक दुसरेच कोणी असतात. खासगी प्रवासी बसेसचा तर एसटी स्थानकाला विळखा असतो. त्याकडे पोलीस, वाहतूक पोलीस, आरटीओ किंवा एसटीचे अधिकारी का दुर्लक्ष करतात? त्याबद्दल त्यांना कोणी जाब का विचारत नाही? बलात्काराची घटना घडल्यानंतर किंवा संपप्त जमावाकडून स्थानकावर तोडफोड झाल्यानंतरच प्रशासनाला व पोलिसांना जाग येणार का? या घटनेनंतर सरकारमधील काही मंत्र्यांनी जी वक्तव्ये केली त्यावरून मुख्यमंत्र्यांना जरा संभाळून बोला अशी तंबी द्यावी लागली. बलात्काराच्या घटनेवरून पीडितेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे योग्य नाही, याचे भान ठेवले पाहिजे. लालपरीची स्थानके अतिक्रमणमुक्त, सुरक्षित व स्वच्छ असावीत हीच प्रवाशांची किमान अपेक्षा आहे.

[email protected]
[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. एस टी आणि नागरिक, प्रवासी सुरक्षा महत्त्वाचा मुद्दा आपण ऐरणीवर आणला. धन्यवाद.

  2. स्वीकृतजी,आपण खरच सामान्य जनतेच्या भावना अतिशय उत्तम शब्दात मांडल्या आहेत. एसटी स्टँड मध्ये अतिशय वाईट अनुभव येत असतो. ते सारखे सांगत असतात , सूचना देत असतात की आपल्या वस्तूंचे काळजी घ्या, मंगळसूत्र सांभाळा . पण जसा एसटीचा प्रवेश होतो तसेच सर्वच एसटी जवळ धावत जातात जागा मिळवण्यासाठी. आपण बस हे प्रवास करतो तेव्हा सुद्धा मात्र रांगेत जात असतो पण एसटी स्टँडवर असे होत नाही. ज्याला धक्के बुके खायचे नाही आहे ते मागेच राहतात. पण या धक्क्या बुक त्यामध्ये वस्तू चोरी होण्याचा संभव खूप जास्त असतो.
    राहिला अत्याचाराचा प्रश्न आज काल हे खूपच मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. समाज असंवेदनशील होत चालला आहे असे कधी कधी वाटते. लहान बालिका, तरुणी , म्हातारे हे सुद्धा सुरक्षित नाही. काही अपराध घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येते असे वाटते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -