वाडा : वाडा तालुक्यातील वावेघर येथील एका कंपनीच्या त्रासाला स्थानिक आदिवासी मेटाकुटीला आले असून अनेकदा तक्रारी करूनही न्याय मिळत नसल्याने करायचे काय असा सवाल लोकांना पडला आहे. स्थानिकांनी अखेर आपल्या कुटुंबासह वाडा तहसिलदार कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा काढून कार्यालयाच्या आवारात तळ ठोकला आहे. वाडा तालुक्यातील औद्योगिकीकरण लोकांच्या जीवावर उठले असून प्रदूषणकारी कारखान्यांचा उच्छादाने जनता मेटाकुटीला आली आहे. वावेघर गावातील एका कंपनीने अनेक दिवसांपासून लोकांना वेठीस धरले असून कारखान्यातून निघणाऱ्या सांडपाण्यामुळे पिण्याच्या पाण्याचे स्रोत संपुष्टात आले आहेत. बॉयलरच्या भीतीने लोकांचे जगणे अवघड झाले असून याबाबत अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन मात्र तारीख पे तारीख देत असल्याने लोकांनी संताप व्यक्त केला आहे.
श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून अखेर येथील अनेक कुटुंबांनी वाडा तहसिलदार कार्यालयाच्या आवारात सुरक्षित स्थळी मुलाबाळांसह आपले बिऱ्हाड घेऊन शुक्रवारपासून ठिय्या मांडला आहे.
Local Meghablock Update : आज पश्चिमसह मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
कारखान्याच्या त्रासाने मरण्यापेक्षा सरकारच्या दारात जीव गेला तर आनंद होईल अशी भावना पिडित कुटुंबांनी व्यक्त केली असून जोपर्यंत कंपनीला टाळे लागत नाही तोपर्यंत मुक्काम हलणार नाही असा इशारा देण्यात आला आहे. आंदोलकांचे मनोबल वाढविण्यासाठी श्रमजीवी संघटनेचे अनेक कार्यकर्ते देखील सहभागी झाले आहेत.