इंडिया कॉलिंग- डॉ. सुकृत खांडेकर
१३ जानेवारीपासून प्रयागराज येथे सुरू झालेल्या महाकुंभमध्ये आजवर पासष्ट कोटी भाविकांनी संगमात पवित्र स्नान केले असावे. महाकुंभसाठी प्रयागराजला किती कोटी भाविक येतील याचे प्रशासनाचे सर्व अंदाज चुकले. तीन महिन्यांपूर्वी स्वत: मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी चाळीस कोटी भाविक येतील असे म्हटले होते. प्रत्यक्षात देशातूनच नव्हे, तर विदेशातूनही सनातनांचा ओघ शेवटच्या दिवसांपर्यंत चालूच होता. भारतातीलच नव्हे, तर जगातील सर्वात मोठा विशाल धार्मिक सोहळा म्हणून महाकुंभची नोंद होईल. दि. २६ फेब्रुवारी हा महाकुंभचा सांगता दिवस. दि. १८ फेब्रुवारीला मौनी आमवास्येला सर्वाधिक म्हणजे आठ कोटी भाविकांनी संगमावर पवित्र स्नान केले. त्यानंतर भाविकांची गर्दी कमी होईल असे वाटले होते, पण नंतरही गर्दी वाढतच राहिली. प्रयागराजकडे जाणाऱ्या सातही रस्त्यांवर दोन महिने अभूतपूर्व भाविकांची गर्दी आणि वाहनांची कोंडी बघायला मिळाली. वाहनांच्या दहा किमी रांगा लागल्या होत्या. भाविकांनाही संगमापर्यंत दहा-बारा किमी पायी चालावे लागले. सार्वजनिक बसेस, रिक्षा व दुचाकींना संगमापर्यंत परवानी होती पण त्यासाठी आवाच्या सव्वा भाडे आकारले जात होते. दिल्ली ते प्रयागराज विमानाचे तिकीट ४२ हजारांपर्यंत आकारले गेले. पण महाकुंभ नंतरचे याच मार्गावर विमानाचे तिकीट तीन हजार रुपयांत मिळू शकते.
भारताची लोकसंख्या अंदाजे १४३ कोटी गृहीत धरली, तर त्यात ११० कोटी सनातन धर्माचे आहेत. जगभरात मिळून १२० कोटी सनातनी असावेत, पैकी ५० टक्क्यांपेक्षा जास्त भाविकांनी संगमात पवित्र स्नान केले हा जागतिक विक्रम म्हणावा लागेल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती धनगड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, बहुतेक केंद्रीयमंत्री, राज्यांमधील भाजपाचे मुख्यमंत्री व शेकडो मंत्री, खासदार, आमदार यांनी महाकुंभमध्ये संगमात डुबकी मारली. भुतानचे राजे खेसर नामग्याल वांगचूक, नेपाळचे शेर बहादूर देऊबा, उद्योगपती मुकेश अंबानी व गौतम अदानी यांनी त्यांच्या परिवारासह पवित्र स्नान केले. चंदेरी दुनियेतील अनेक सेलिब्रेटींनी संगमावर हजेरी लावली. अभिनेत्री व नंतर संन्यासी झालेल्या ममता कुलकर्णी यांना महामंडलेश्वर सन्मान दिल्याबद्दल वादही याच काळात झाला. जवळपास ७५ देशांच्या राजदूतांनी महाकुंभमध्ये प्रयागराजला संगमात स्नान केले. पौष पौर्णिमा, वसंत पंचमी, ३० जानेवारी व १ फेब्रुवारीला पवित्र स्नान करणाऱ्यांची संख्या कोटींवर होती. दोन महिन्यांत प्रयागराजमध्ये राहणाऱ्या नागरिकांची मात्र मोठी कोंडी झाली. या नगरीत पासष्ट कोटी भाविकांची ये-जा झाली. शाळा तर दोन महिन्यांपासून बंद आहेत. अलाहाबाद विद्यापीठ व महाविद्यालये चालू असली तरी प्राध्यापक व विद्यार्थी वेळेवर पोहोचू शकले नाहीत. ऑनलाइन वर्ग चालू असले तरी मुले अभ्यास करीत नाहीत. उत्तर प्रदेश शालेय बोर्डाने दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. रस्त्यावर एवढी गर्दी की, वयस्कर घराबाहेर पडू शकले नाहीत व कुठे पायीसुद्धा जाऊ शकले नाहीत. महाकुंभच्या महाप्रसिद्धीमुळे कोट्यवधी लोक आले, आता गर्दी थांबवा अशी म्हणायची स्थानिकांवर पाळी आली.
अमृत महोत्सवी स्नान झाल्यावर गर्दी कमी होईल असे वाटले होते, पण तसे घडले नाही. प्रचंड गर्दी व प्रचंड वाहतूक कोंडी, रोज वेगवेगळे रस्ते बंद, व्हीआयपींची मोठी ये-जा, कुणाच्या पोटात दुखले, आजारी पडले तरी सहज डॉक्टरांकडे पोहोचता येत नाही, रिक्षा मिळत नाही, सर्वत्र बॅरिकेटस, मोठा सुरक्षा बंदोबस्त, स्टेशनकडे जाणारे रस्ते बंद, न्यायालयात सुनावणी होत नाही, वकील, पक्षकार पोहोचू शकत नाहीत. गेले दोन महिने प्रयागराजमधील जनजीवन सुरक्षा व गर्दीच्या कोंडीत सापडले आहे. ज्या संगमात पन्नास-साठ कोटी लोक स्नान करतात ते पाणी शुद्ध कसे राहील? या प्रश्नाने काही काळ वादळ निर्माण केले. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने हरित लवादाला सादर केलेल्या अहवालात संगमातील पाणी अशुद्ध असलेल्याचा अहवाल दिला. पाण्यात विष्ठेतील जीवाणू आहेत, असे त्यात म्हटले होते. त्यावर मुख्यमंत्री योगी यांनी स्वत: खुलासा केला. गंगेचे पाणी जंतुविरहीत व शुद्ध आहे, स्नानाला व पिण्यासही योग्य आहे असे त्यांनी सांगितले. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आहे. मग संगमातील पाणी शुद्ध आणि अशुद्ध असे दोन वेगळे अहवाल कसे? महाकुंभचा योग १४४ वर्षांनी आला म्हणून कोट्यवधी भाविक प्रयागराजला संगमावर धावले हे वास्तव आहे. हा श्रद्धेचा विषय आहे. १४४ वर्षांपूर्वी अमृत स्नानाला आपण नव्हतो व १४४ वर्षांनंतर पुन्हा योग येईल तेव्हा पवित्र स्नान करायला आपण नसणार, अशी भावना प्रत्येकाच्या मनात बळावली. वृत्तपत्रे, वाहिन्या, सोशल मीडिया, ट्रेन, बसेस सर्वत्र महाकुंभच्या जाहिराती झळकल्या. दि. १५ डिसेंबरला आखाड्यांची मिरवणूक निघाली तेव्हा सर्व जगाचे लक्ष वेधले गेले.
प्रयागराज महाकुंभ १३ जानेवारी रोजी सुरू झाले तरी त्याची तयारी वर्षभर अगोदर चालू होती. सहा महिने अगोदरपासून उत्तर प्रदेशमधील जिल्ह्यात व तालुक्यात चलो कुंभ चले… असे बॅनर्स व होर्डिंग झळकले होते. जयतु महाकुंभ, जयतु सनातन, हे तर महाकुंभचे घोषवाक्य बनले होते. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बातच्या ११७व्या मालिकेत महाकुंभ २०२५ ची चर्चा केली होती. संगमावर कशी जय्यत तयारी चालू आहे, याची माहिती दिली होती. महाकुंभ सुरू होण्यापूर्वी त्यांनी हेलिकॉप्टरमधून तयारीची पाहणी केली होती. योगींनी स्वत: पाच वेळा महाकुंभला भेट दिली. स्वत: मोदींनी दोन वेळा संगमात स्नान केले. २०१९ च्या कुंभच्या तुलनेने जनसुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिल्या. महाकुंभला जाण्यासाठी देशभरातून शेकडो विशेष रेल्वे गाड्या, जादा विमान सेवा उपलब्ध करण्यात आल्या.
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटले की, महाकुंभ १४४ वर्षांनी आला असे सांगतात, पण यापूर्वी २००१ व २०१३ च्या कुंभला महाकुंभ म्हटले होते. बागेश्वरधामचे पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी तर महाकुंभमध्ये स्नान न करणारे देशद्रोही आहेत, अशी टिप्पणी केली. विशाल महाकुंभचे व्यवस्थापन मोठ्या प्रमाणावर करण्यात आले होते तरीही महिन्याभरात पाच दुर्घटना घडल्या. महाकुंभ क्षेत्रात ३५० पेक्षा जास्त फायरब्रिगेड, दोन हजारांपेक्षा जास्त प्रशिक्षित अग्निशमन दलाचे जवान, ५० अग्निशमन केंद्रे होती. आखाडे व तंबूत काही दुर्घटना घडू नये म्हणून तिथे अग्निसुरक्षा उपकरणांची व्यवस्था होती. मौनी आमवास्येला झालेल्या चेंगराचेंगरीत चाळीस लोकांचा मृत्यू झाला, तर दिल्लीत रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जण मरण पावले. या घटनेनंतर वादग्रस्त ठरलेले धीरेंद्र शास्त्री म्हणाले – जो कोई गंगा किनारे मरेगा, वह मरेगा नही बल्की मोक्ष प्राप्त करेगा….
देशातील प्रत्येक भाविक योगींच्या कामाचे कौतुक करीत आहे पण राहुल गांधी, अखिलेश यादव किंवा ममता बॅनर्जींसारखे नेते मात्र महाकुंभमधील चुका व त्रुटी शोधून त्यावर टीका करीत राहिले. अखिलेश यादव तर सुरुवातीपासून महाकुंभला विरोध करीत आहेत. महाकुंभचे एवढे विशाल आयोजन का, असा प्रश्न विचारून अखिलेश यांनी महाकुंभला एवढा मोठा निधी कशासाठी असा प्रश्न विचारला होता. महाकुंभमध्ये ७० लोकही स्नानासाठी येणार नाहीत, असे भाकीत अखिलेश यांनी वर्तवले होते. सरकारी पैसे खर्च करण्यासाठी महाकुंभ असा शब्दप्रयोग वापरण्यात येतो आहे, अशी टीका त्यांनी केली होती. लालूप्रसाद यादव यांनी महाकुंभ फालतू असल्याचे म्हटले. ममता बॅनर्जी यांनी तर महाकुंभला मृत्यूकुंभ संबोधले. ज्यांनी अयोध्येतील राम मंदिराला विरोध केला ते महाकुंभच्या विरोधात बोलत आहेत, हेच गेले दोन महिने ऐकायला मिळाले. पण जयतु महाकुंभ, जयतु सनातन म्हणत, मोदी आणि योगींनी महाकुंभचे शिवधनुष्य उचलून दाखवले.
[email protected]
[email protected]