नवी दिल्ली : केंद्र राज्याचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर काही दिवसांतच मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर झाला. त्यानंतर आता महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget Session 2025) सादर होण्याची तारीखही जाहीर झाली. ३ मार्च २०२५ पासून राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशन सुरु होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सोमवार ३ मार्च ते बुधवार २६ मार्च २०२५ या कालावधीत होणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प १० मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करतील. विधानभवन मुंबई येथे विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक रविवारी झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली.
या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीष महाजन, शंभुराज देसाई, आमदार प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, ॲड.अनिल परब, हेमंत पाटील, श्रीकांत भारतीय, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, डॉ.नितीन राऊत, रणधीर सावरकर, अमिन पटेल, विधिमंडळ सचिव (1) जितेंद्र भोळे, सचिव (2) विलास आठवले यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाल्या होत्या. अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीत शनिवार ८ मार्च २०२५ रोजी सार्वजनिक सुटीच्या दिवशी विधिमंडळाचे कामकाज सुरू राहील, तर १३ मार्च २०२५ रोजी होळी निमित्त कामकाजास सुटी असेल.
अधिवेशनात १० मार्च रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून अर्थसंकल्पावर चर्चा सुरु होणार आहे. दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपालांचं अभिभाषण होईल. त्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणावर दोन दिवस चर्चा होणार आहे. तसेच त्यानंतर पुरवणी मागण्या मांडल्या जाणार आहेत.
काय होणार चर्चा?
विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचं सरकार सत्तेत आलं. त्यामुळे केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आता महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होणार असल्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष याकडे लागलं आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. अधिवेशनात ८ मार्च रोजी महिला दिननिमित्त महिलांच्या प्रश्नांवर विशेष चर्चा करणार आहेत. तर २५ आणि २६ मार्च रोजी देशाच्या राज्यघेटनेचा अमृत महोत्सव असल्यामुळे संविधानावर दोन दिवस चर्चा केली जाणार आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी, सोयाबीन आणि कापूस खरेदी तसेच पीक विमा, महाराष्ट्र – कर्नाटक सीमेवरील तणाव हे मुद्दे अर्थसंकल्पीय अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे.