मुंबई : छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित छावा चित्रपट नुकताच रिलीज झाला. या चित्रपटाला महाराष्ट्रासह देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, या चित्रपटात राजेशिर्केंची बदनामी केली जात असल्याचा आरोप शिर्के घराण्याच्या वंशजांनी केला आहे. राजेशिर्के परिवाराने पत्रकार परिषद घेत दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्यासह निर्मात्यांना नोटीस पाठवून गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे. शिवजंयतीच्या पार्श्वभूमीवर कोणताही गोंधळ नको म्हणून आम्ही गप्प बसलो. आज आम्ही राजेशिर्के परिवाराची होणारी बदनामी करणारे सीन वगळावे, अशी मागणी दीपक राजेशिर्के यांनी केली.
लवकरात लवकर चित्रपटातील वादग्रस्त दृश्ये वगळावेत. आम्ही १०० कोटींच्या अब्रू नुकसानीचा दावा ठोकू असा इशारा राजेशिर्के परिवाराने दिला आहे. यावेळी अजूनही आमचे छत्रपती घराण्यांशी चांगले संबंध असल्याचेही दीपक राजेशिर्के यांनी सांगितले. छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाला राजेशिर्केंची मुलगी दिली. त्यानंतर आतापर्यंत छत्रपती घराण्याशी १३ सोयरीक असल्याची माहितीही त्यांनी दिली.
गद्दारीचा शोध इतिहास संशोधकांनी घ्यावा
गद्दारी कुणी केली हे इतिहास संशोधकांनी शोधून काढावे. पण राजेशिर्केंची बदनामी न करण्याचे आवाहन राजेशिर्केंच्या वंशजांनी केले. बखरीत जे लिहिलेय, त्यावरही शिर्केंच्या वंशजांनी शंका उपस्थित केली. ज्याला छत्रपती संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायी दिले. त्याच्याच नातवाने १२२ वर्षांनी बखर लिहिली आहे. त्याच्या डोक्यात द्वेष नसेल का? ते चिटणीस होते, कायदेपंडित होते. आम्ही लढायचे काम केले असेही दीपक राजेशिर्के म्हणाले.
वतनदारी हा घरातला मुद्दा
वतनदारीच्या मुद्द्यावर बोलताना शिर्केंचे वंशज म्हणाले की, शिर्के घराणे हे छत्रपती शिवराय, संभाजीराजे यांच्या आधी साडेतीनशे वर्षांपासून राजे होते. रायगडसुद्धा शिर्केंकडे तीनशे वर्षे होता. कोकण आणि मुंबईच्या भागाला शिरकान म्हटले जायचे. हा भाग स्वराज्यात विलीन करण्यासाठी विश्वासाने दिला होता. छत्रपती होण्यासाठी, स्वराज्य होण्यासाठी शिर्केंचे मोठे योगदान आहे. तर वतनदारी हा घरातला मुद्दा आहे.