Sunday, June 7, 2026

NCP Rajendra Jain : राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना उमेदवारी; 'पक्षाचा विश्वास सार्थ ठरवणार', राजेंद्र जैन यांची प्रतिक्रिया

NCP Rajendra Jain : राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना उमेदवारी; 'पक्षाचा विश्वास सार्थ ठरवणार', राजेंद्र जैन यांची प्रतिक्रिया

मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभा (Rajya Sabha) जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) विदर्भातील ज्येष्ठ नेते राजेंद्र जैन यांचे नाव नक्की केले आहे. राष्ट्रवादीच्या कोअर कमिटी (Core Committee) बैठकीत त्यांच्या नावाला अंतिम मंजुरी देण्यात आली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माध्यमांसमोर राजेंद्र जैन यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राजेंद्र जैन यांनी माध्यमांशी संवाद साधत पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. "राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून मी एक कार्यकर्ता म्हणून पक्षासाठी काम करत आहे. अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली दोन वेळा विधान परिषद (Legislative Council) सदस्य म्हणून निवडून आलो. गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा (District Central Cooperative Bank) अध्यक्ष म्हणूनही गेल्या १९ वर्षांपासून कार्यरत आहे," अशी माहिती त्यांनी दिली.

"पक्षाने माझ्यावर जी जबाबदारी सोपवली आहे आणि सुनेत्रा पवार यांनी जो विश्वास दाखवला आहे, तो मी निश्चितपणे सार्थ ठरवेन. विदर्भात पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करत राहीन. एका सामान्य कार्यकर्त्यावर पक्षाने दाखवलेला विश्वास मी कृतीतून सिद्ध करून दाखवेन," असे राजेंद्र जैन म्हणाले.

पक्षातील नाराजीच्या चर्चांवर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, "माझे वरिष्ठ नेते हे माझ्यासाठी वडिलांसारखे आहेत. आमच्या पक्षात नाराजीला स्थान नाही. गेल्या १५ वर्षांत वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद मला सातत्याने मिळाले आहेत. आम्ही सर्वजण एक संघ (Team) म्हणून काम करतो. पक्षासाठी एकनिष्ठपणे आणि प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे हे फळ आहे."

दरम्यान, सुनील तटकरे यांनी सांगितले की, राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीने सखोल चर्चा करून महायुतीचे (Mahayuti) उमेदवार म्हणून राजेंद्र जैन यांच्या नावाला एकमताने मंजुरी दिली. विधान परिषदेत गोंदिया-भंडारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे त्यांनी १२ वर्षे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच सहकार क्षेत्रातील विविध संस्थांमध्ये त्यांनी दीर्घकाळ काम केले आहे. विदर्भाला प्रतिनिधित्व देण्याच्या भूमिकेतून पक्षाने हा निर्णय घेतल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.

राजेंद्र जैन हे विदर्भातील गोंदिया जिल्ह्याचे रहिवासी आहेत. त्यांनी यापूर्वी विधान परिषद आमदार (MLC) म्हणून काम केले आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. राज्यसभा उमेदवारीसाठी प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्या नावासाठी जोरदार पाठपुरावा केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा