प्रयागराज : प्रयागराज महाकुंभातील व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या आणि विकणाऱ्या अकाऊंटविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. श्रद्धाळू महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ, फोटो करून आणि टेलिग्रामवर विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आता या लोकांची ओळख करून त्यांना अटक केली जाणार असल्याचे पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितले.
प्रयागराजला महाकुंभ सुरू आहे. त्यामुळे कोट्यवधी भाविक या महाकुंभात सामील झाले आहेत. विविध भाषा बोलणारे देशातील कानाकोपऱ्यातील लोक या महाकुंभात आले आहेत. फक्त देशातूनच नाही तर विदेशातूनही विदेशी पर्यटक महाकुंभात आले आहेत. या ठिकाणी श्रद्धेने पूजापाठ करत आहेत. संगमात जाऊन डुबकी मारत आहेत. मात्र, अशा ठिकाणी काही विकृत गोष्टीही घडताना दिसत आहे. काही लोक या महाकुंभात अंघोळ करणाऱ्या आणि कपडे बदलणाऱ्या स्त्रियांचे व्हिडीओ काढून ते विकत आहेत. त्यामुळे संताप व्यक्त केला जात असून पोलिसांनी अशा लोकांविरोधात कठोर कारवाई करण्यास सुरुवातही केली आहे.
महाकुंभात ५५ कोटी लोक आले आहेत. सर्व श्रद्धाळू गंगेत डुबकी मारत आहेत. गंगेत पवित्र स्नान करण्यासाठीच लोक या ठिकाणी येत आहेत. मात्र, काही लोक या अंघोळ करणाऱ्या महिलांचे व्हिडीओ काढत आहेत. त्यांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ काढून इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्रामवर पोस्ट करत आहेत. काही लोक तर हे व्हिडीओ विकतही आहेत. १९९९ ते ३००० रुपयांपर्यंत हे व्हिडीओ विकले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.