Saturday, March 22, 2025
Homeताज्या घडामोडीShivneri Festival 2025 : शिवनेरी जुन्नर येथे १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान...

Shivneri Festival 2025 : शिवनेरी जुन्नर येथे १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान रंगणार ‘शिवजन्मोत्सव’

* मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२५’चे उद्घाटन : शंभूराज देसाई

मुंबई : छत्रपती शिवरायांच्या ३९५ व्या जयंती निमित्त महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग,पर्यटन संचालनालय व पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर, शंकरराव बुट्टे-पाटील विद्यालय मैदानाच्या प्रांगणात दि. १७ ते १९ दरम्यान ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे.१७ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता या सोहळ्याचे उद्धाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दि. १९ फेब्रुवारी रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त १७ ते १९ फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्राची संस्कृती, कला, लोककला, सभ्यता आणि परंपरा दाखवणाऱ्या विविध कार्यक्रमांचा समावेश असलेल्या ‘शिवजन्मोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री अजित पवार , सहकार आणि नागरी विमान वाहतूक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ ,उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, इंद्रनील नाईक, राज्यसभा सदस्य मेधा कुलकर्णी, सुनेत्रा पवार, लोकसभा सदस्य सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, पुणे जिल्ह्यातील सर्व विधानपरिषद विधानसमा सदस्य आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Love Jihad : लव्ह जिहाद रोखण्यासाठी राज्यात धर्मांतर विरोधी कायद्यासंदर्भात विशेष समिती गठीत

महोत्सवातंर्गत दि.१७ फेब्रुवारी सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत राज्यातील महिला बचतगटांच्या उत्पादनांना चालना देण्यासाठी विविध बचतगटांची उत्पादने व खाद्य पदार्थाच्या स्टॉलचे प्रदर्शन लावण्यात येणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत महाराष्ट्राच्या जिद्दीचे प्रतीक असलेली शिवनेर महोत्सव बैलगाडा शर्यत घेण्यात येणार असून मराठी मातीतील भव्य कबड्डी स्पर्धा सकाळी ११ वाजता असणार आहे. रात्रौ. ८ वाजता शिवस्पर्श शिवसह्याद्री सरसेनापती उमाबाई दाभाडे प्रतिष्ठान च्या वतीने (शिवसह्याद्री ऐतिहासिक महानाटयाचा) प्रयोग सादर करण्यात येणार आहे.

दि. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते रात्रौ ९ पर्यंत विविध बचतगटांची उत्पादने व खाद्य पदार्थाच्या स्टॉलचे प्रदर्शन असणार आहे तर स्वरांजली कलामंच, पुणे निर्मित(गौरव माझ्या महाराष्ट्राचा) हा सांस्कृतिक कार्यक्रम रात्रौ ८ वाजता सादर करण्यात येणार आहे. तसेच शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर रात्री १२ वाजता छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात येणार आहे.

दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत जुन्नर तालुक्यातील गुणवंत कलाकार शिवकालीन खेळांची प्रात्यक्षिके सादर करतील. सायंकाळी ५ वाजता छत्रपती शिवरायांची महाआरती व सायंकाळी ६ वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. सायंकाळी ७ वाजता सुप्रसिद्ध पार्श्वगायिका वैशाली सामंत यांचा संगीत रजनी कार्यक्रम होणार आहे.

दि. १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान हा शिवजन्मोत्सव जुन्नर येथील शंकरराव बुट्टे-पाटील विद्यालय मैदानाच्या प्रांगणात पार पडणार असून महाराष्ट्रातील तमाम नागरिक आणि शिवप्रेमींनी या महोत्सवाला आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पर्यटन संचालक डॉ.बी.एन. पाटील यांनी केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -