Tuesday, March 18, 2025
Homeदेशमहाकुंभात आतापर्यंत ४५ कोटी भाविकांचे स्नान 

महाकुंभात आतापर्यंत ४५ कोटी भाविकांचे स्नान 

प्रयागराज : उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथे आयोजित महाकुंभमेळ्यांतर्गत आतापर्यंत सुमारे ४५ कोटी भाविकांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले आहे. त्यामुळे हा इतिहासातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा ठरला आहे.

हा कुंभ मेळा समाप्त होण्यासाठी अद्यापही १५ दिवस बाकी आहेत. अशात ४५ कोटी इतक्या विक्रमी संख्येने भाविकांचा ओघ असल्याने गर्दीच्या व्यवस्थापनावर विशेष भर देण्यात आला आहे. यापुढचे अमृत स्नान १२ फेब्रुवारी २०२५ रोजी माघ पौर्णिमा स्नानाच्या दिवशी आहे. गुरु बृहस्पतींच्या पूजनाशी संबंध असल्याने आणि या दिवशी या संगमावर स्वर्गातून गंधर्व भूलोकी उतरतात अशी हिंदू पुराणातील धारणा असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व आहे. माघ पौर्णिमा स्नानाच्या काळात गर्दीचे व्यवस्थापन सुविहित होण्याकरिता राज्य सरकारने मेळ्याच्या परिसरात ११ फेब्रुवारीच्या सकाळपासून वाहनबंदी क्षेत्र घोषित केले आहे आणि केवळ अत्यावश्यक आणि आकस्मिक सेवांच्या वाहनांनाच तिथे प्रवेश दिला जाईल.

महाकुंभ २०२५ ला जाणाऱ्या भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी भारतीय रेल्वे आपल्या सेवा पूर्ण क्षमतेने चालवत आहे. ९ फेब्रुवारी रोजी सुमारे ३३० रेल्वे गाड्यांमधून १२.५ लाख भाविक दाखल झाले तर १० फेब्रुवारीला दुपारी ३ वाजेपर्यंत आणखी १३० गाड्या रवाना झाल्या. १२ फेब्रुवारी २०२५ रोजी होणाऱ्या अमृत स्नानाच्या तयारीचा अधिकारी आणि केंद्रीय मंत्र्यांनी आढावा घेतला. प्रयागराज जंक्शनसह सर्व आठ रेल्वे स्थानकांचे परिचालन पूर्ण क्षमतेने केले जात आहे तर गर्दीच्या व्यवस्थापनासाठी स्नानाच्या प्रमुख तारखांच्या काळात प्रयागराज संगम स्थानक तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहे.

विविध संस्थांच्या सहकार्याने राज्य सरकारने एक बहु-स्तरीय सुरक्षा आणि देखरेख प्रणाली तैनात केली आहे. एआय-आधारित सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे, ड्रोन टेहळणी आणि रियल टाईम ऍनालिटिक्सच्या वापरामुळे महत्त्वाच्या जागी भाविकांची सुरक्षित ये-जा सुनिश्चित झाली आहे.स्नान घाटांवर भाविकांना सहजतेने स्नान करता यावे यासाठी प्रशासनाने डिजिटल टोकन प्रणालीचा वापर सुरू केल्यामुळे, स्नानासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी टाळता आली आहे. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग भाविकांसाठी विशेष सुविधा करण्यात आल्या, ज्यामुळे हा कुंभ मेळा आध्यात्मिक अनुभूती देणारा एक सर्वसमावेशक सोहळा ठरला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -