रायगड: अभिनेता सैफ अली खान याच्यावर चोरीसाठी चाकूने हल्ला करणारा बांगलादेशी ठाण्यातील कासारवडवलीतील मजुरांच्या एका वसाहतीच्या मागील जंगलात पकडला गेल्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा बांगलादेशींवरील कारवाईला वेग आला आहे. गेल्या वर्षभरात रायगड पोलिसांनी २७ बांगलादेशींवर कारवाई केली. यामध्ये स्थानिक घरमालक आणि ठेकेदार यांच्या कृपेने बांगलादेशी वास्तव्य करीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे स्थानिक घरमालक आणि कंपनी ठेकेदारांना भाडोत्री ठेवताना तपासणी करूनच ठेवण्याच्या सुचना रायगड पोलिसांनी केल्या आहेत. बांगलादेशी हे त्यांचा देश सोडून घुसखोरी करून भारतात येतात. याठिकाणी येऊन आपली ओळख लपवून ते राहतात.
काही जणांकडे आधारकार्ड, रेशनकार्डही आहेत, स्थानिक घरमालक हे भाडोत्री ठेवताना कोणतीही शहानिशा न करता त्यांना भाडोत्री म्हणून ठेवतात. रायगड जिल्ह्यात आतापर्यंत सापडलेले बांगलादेशी हे बांधकामांच्या ठिकाणी काम करताना सापडले असून, महाड एमआयडीसीमधून सहा बांगलादेशींना पकडण्यात आले होते, तर पनवेल तालुक्यात रसायनी पोलीस ठाणे हद्दीत दोन बांगलादेशींना पकडण्यात आले होते. यावेळी ते वास्तव्यास असलेल्या घरमालकांवर कारवाई करण्यात आली आहे. २०१३ पासून रायगड पोलिसांनी राबविलेल्या सातत्यपूर्ण धडक शोध मोहिमेचा धसका या बांगलादेशी नागरिकांनी घेण्यास सुरुवात झाली आहे. मात्र पुन्हा बांगलादेशी घुसखोरीला ऊत आल्यामुळे पोलीस सतर्क झाले आहेत. रायगड जिल्ह्यात औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत आहे. वेगवेगळ्या कामानिमित्त वेगवेगळ्या राज्यातून कामगारांना बोलावले जाते. रस्ते व इतर बांधकामांसाठी परराज्यातील कामगारांची संख्या जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत आहे; परंतु यातील काही कामगार बांगलादेशातील असूनही ते ठेकेदाराच्या मदतीने ओळख लपवून जिल्ह्यात राहत असल्याचे चित्र आहे. प्रस्तावित तिसऱ्या मुंबईचे क्षेत्र पेण, अलिबागपर्यंत आहे. त्यामुळे या भागात घुसखोरांची संख्या वाढण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविण्यात येत आहे.
भाडोत्री ठेवताना तपासणी करून ठेवण्याच्या सूचना
रायगड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत २७ बांगलादेशी घुसखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. २०२४ पर्यंत २१ आणि २०२५ मध्ये जानेवारीत ६ बांगलादेशींना पकडण्यात आले आहे. रोजंदारीच्या नावाखाली जिल्ह्यात बांगलादेशींची घुसखोरी वाढू लागली आहे. काही स्थानिकांसह ठेकेदारांचे त्यांना अभय मिळत आहे.
रायगड जिल्ह्यात घरमालक भाडेकरू ठेवत असताना त्याची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक आहे. मोठमोठ्या कंपन्यांच्या ठिकाणी, महामार्ग, रेल्वे मार्गाची कामे सुरू आहेत, अशा ठिकाणी कंत्राटी कर्मचारी ठेवताना त्याची शहानिशा करूनच ठेवा, अशा सूचना करण्यात आलेल्या आहेत. – सोमनाथ घार्गे, (जिल्हा पोलीस अधीक्षक)