मुंबई : माहिममधील भंडार गल्लीतील १३ बांधकामांवर मुंबई झोपडपट्टी पुनवर्सन प्राधिकरणांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सर्व कुटुंबांना मिनाताई ठाकरे एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये पात्र भाडेकरु म्हणून सदनिका असल्याचे सांगितले जाते, परंतु, या गृहनिर्माण संस्थेमध्ये सदनिका उपलब्ध करून न देता यासर्व मराठी कुटुंबांच्या घरांवर प्राधिकरणाने बुलडोझर चढवला. दादरमधील दहा गृहनिर्माण संस्थांचा पुनर्विकास अनेक वर्षांपासून रखडला असून या सर्व प्रकल्पांची पाहणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत होते, त्याचवेळी माहिममधील भंडार गल्लीतील १३ मराठी कुटुंबांच्या घरांवर एसआरए प्राधिकरणाने बुलडोझर चढवून त्यांना बेघर केले गेले.
माहिममधील भंडार गल्लीतील मिनाताई ठाकरे एसआरए गृहनिर्माण संस्थेतील टीपी रोडवरील १३ झोपडीधारक हे शांती धर्मा को ऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटी व हरिश्चचंद्र को ऑप सोसायटी यांच्या प्रवेशद्वाराजवळ अजुनही वास्तव्यास असल्याने या झोपड्यांचे अतिक्रमण हटवण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका केली होती. या रिट याचिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालाने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी आदेश पारित केले होते.
त्यानंतर आचारसंहितेअभावी ही कारवाई न झाल्याने याठिकाणी १३ झोपडीधारक हे सहकार्य करत नसल्याने बुधवारपर्यंत या झोपड्या रिकाम्या करून द्याव्यात अशाप्रकारच्या सूचना एसआरए प्राधिकरणाने दिल्या होत्या.
प्राधिकरणाच्या कारवाईत विसंगती
परंतु या झोपड्या रिकाम्या न केल्याने बुधवारी यासर्व घरांवर कारवाई करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी विशेष पोलिस फौजफाटा घेऊन प्राधिकरणाचे अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी हे तैनात झाले आणि त्यांनी या सर्व बांधकामांवर महापालिकेच्या मदतीने बुलडोझर चढवून कारवाई केली. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार काही दिवसांपूर्वी एसआरए प्राधिकारणाने मिनाताई एसआरए गृहनिर्माण संस्थेतील घुसखोरांची यादी जाहीर केली. यामध्ये काही कुटुंबांनी आली कागदपत्रे सादर केल्यानंतरही २० घुसखोर आढळून आले. त्यामुळे या घुसखोरांना बाहेर काढून कारवाई केलेल्या आणि अनेक वर्षांपासून याठिकाणी वास्तव्यास असलेल्या १३ कुटुंबांचे पुनर्वसन करता येवू शकते. परंतु प्राधिकरणाने विकासकावर कारवाई न करता तसेच घुसखोरांवरच बाहेर न काढता मराठी कुटुंबांवर अन्याय केला असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे प्राधिकरणाच्या कारवाईत विसंगती आढळून येत आहे.
या कारवाईचा तीव्र निषेध करून जर या कुटुंबांची घरे मिनाताई ठाकरे आहेत तर मग त्या घरांचा ताबा त्यांना न देता त्यांच्यावर कारवाई करून त्यांना बेघर का केले जाते. जर इमारतीत २० घुसखोर आहेत,असे दिसून आले. तर मग त्यांच्यावर कारवाई करून त्या सदनिकांमध्ये कारवाई करण्यात आलेल्या कुटुंबांचे पुनर्वसन करायला हवे होते. पण घुसखोरांवर कारवाई करायची नाही आणि ज्याच्या दोन पिढ्या याठिकाणी राहिल्या, त्यांच्या घरांवर बुलडोझर फिरवताना किमान आपले कर्तव्य तरी प्राधिकरणाने पार पाडायला हवे होते असे म्हटले आहे. – शीतल देसाई, भाजपाच्या मुंबई महिला मोर्चाच्या अध्यक्षा