राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात संपन्न
नवी दिल्ली : आपली लोकशाही जगातील सर्वात जुनी लोकशाही आहे. सोबतच ती जगातील सर्वात मोठी, वैविध्यपूर्ण, तरुण, सर्वसमावेशक आणि संवेदनशील लोकशाही असून आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले.
राष्ट्रीय मतदार दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
देशात निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी अनुकरणीय कामगिरी केलेल्या राज्य आणि जिल्हा अधिकाऱ्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सर्वोत्कृष्ट निवडणूक पद्धती पुरस्कार प्रदान केले गेले. याप्रसंगी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी राष्ट्रपतींना ‘इंडिया व्होट्स २०२४ : अ सागा ऑफ डेमोक्रसी’ या पुस्तकाची पहिली प्रतही भेट दिली. यावेळी राष्ट्रपती म्हणाल्या की, आधुनिक काळातल्या जगासाठी भारताची लोकशाही म्हणजे एक सर्वोत्तम उदाहरण असल्याचे त्या म्हणाल्या. जगभरातील अनेक देश आपल्या निवडणूक पद्धती आणि व्यवस्थापनातून शिकवण घेत असल्याचेही त्यांनी नमूद केले. आपल्या निवडणुकांमध्ये देशाच्या सर्वसमावेशक लोकशाहीची प्रभावी झलक दिसून येते असे त्यांनी सांगितले.
President Droupadi Murmu graced 15th National Voters’ Day Celebrations and presented the Best Electoral Practices Awards in New Delhi. The President said that it is a matter of pride for all of us that our democracy is not only the oldest democracy in the world but is also the… pic.twitter.com/etVJkA276v
— President of India (@rashtrapatibhvn) January 25, 2025
निवडणुकीत महिलांचा वाढता सहभाग हे आपल्या समाजाच्या आणि देशाच्या सर्वांगीण विकासाचे महत्त्वाचे निदर्शक आहे असे त्या म्हणाल्या. ८५ वर्षांवरील ज्येष्ठ मतदार, दिव्यांग मतदार आणि दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी मतदारांसाठी मतदान प्रक्रिया सुलभ व्हावी, याकरता निवडणूक आयोगाने विशेष प्रयत्न केले आहेत. अशा प्रयत्नांमधून निवडणूक आयोगाने सर्वसमावेशक आणि संवेदनशील निवडणूक व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे अशा शब्दांत त्यांनी निवडणूक आयोगाच्या प्रयत्नांचे कौतुक केले. मतदानाशी संबंधित आदर्श आणि जबाबदाऱ्या हे आपल्या लोकशाहीचे महत्वाचे पैलू आहेत. निवडणूक आयोगाची मतदार प्रतिज्ञा ही सर्व नागरिकांसाठी मार्गदर्शक ठरू शकते असे त्यांनी सांगितले.
मतदारांनी लोकशाहीवर अढळ विश्वास ठेवण्यासोबतच, सर्व प्रकारच्या संकुचित विचारसरणी, भेदभाव आणि प्रलोभनाच्या पलीकडे जात आपला मतदानाचा हक्क बजावण्याचा ठाम निर्धारही करायला हवा असे आवाहन त्यांनी केले. सुजाण मतदारच आपल्या लोकशाहीला बळकटी देत असतात ही बाबही त्यांनी नमूद केली. भारत निवडणूक आयोगाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून २०११ सालापासून दरवर्षी २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो आहे.