मुंबई : कर्नाक आणि मिठी नदीच्या पुलाच्या डागडुजीसाठी आज रेल्वे प्रशासनाने विशेष मेगाब्लॉक जाहीर केला आहे. हा मेगाब्लॉक ५ टप्प्यात घेण्यात येणार आहे तसेच २७५ गाड्या रद्द करण्यात येणार आहे. मध्य रेल्वे, आणि पश्चिम रेल्वे मार्गावर विशेष मेगाब्लॉक जाहीर केला आहे. दरम्यान या मेगाब्लॉक प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरला आहे.
पश्चिम रेल्वेच्या माहीम ते वांद्रे दरम्यान मिठी नदीच्या पुलाच्या कामासाठी २४ ते २६ जानेवारीच्या रात्री २७५ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेवर कर्नाक पुलाच्या कामासाठी दोन टप्प्यात विशेष मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. याचाच फटका सकाळी कामावर जाणाऱ्या नोकरदारवर्गाला बसला आहे.
यापैकी पहिला ब्लॉक शुक्रवार आणि शनिवारच्या मध्यरात्री घेण्यात आला. शनिवार-रविवारच्या मध्यरात्री आणि रविवार-सोमवारच्या मध्यरात्रीही हे काम सुरू राहणार आहे. त्यानंतर ३१ जानेवारी, १ व २ फेब्रुवारी रोजी रात्रभर पुलासंबंधीची कामे हाती घेतली जातील. त्यामुळे पश्चिम, मध्य तसेच हार्बर मार्गाच्या मुख्य व उपनगरीय वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.
Pune Accident : पुण्याहून मित्राचा वाढदिवस साजरा करून घरी जाणाऱ्या ६ जणांवर काळाचा घाला
मुख्य मार्गावरील गाड्या ठाणे, कुर्ला, परळ आणि भायखळा या स्थानकांवर, तर हार्बर मार्गावरील गाड्या वडाळा रोड येथे थांबवल्या जातील. मुख्य मार्गावरून रात्री १०.४७ वाजता कसाऱ्याला जाणारी जलद लोकल ही शेवटची लोकल असेल. तर हार्बरवरून शेवटची गाडी १०.५८ वा. पनवेलला रवाना होईल.
दरम्यान या मेगाब्लॉकच्या कालावधीत चर्चगेट ते दादर दरम्यानच्या गाड्या जलद मार्गावर चालवल्या जातील. शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या या मेगाब्लॉकमुळे पश्चिम रेल्वे प्रवाशांचे हाल झाले आहेत.तसेच लांबपल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकालाही याचा फटका बसला आहे. अनेक रेल्वे स्थानकावर प्रवाशांची झुंबड पाहायला मिळते आहे. पश्चिम, मध्य, हार्बर मार्गावरील सर्व उपनगरीय लोकल सेवा उशीराने सुरू आहे. रस्ते महामार्गावर देखिल ठिकठिकाणी वाहनांच्या खूप मोठ्या रांगा लागल्या आहेत.