आधी हार्दिक, नंतर चहल, आता वीरेंद्र सहवागच्या मागे शुक्लकाष्ठ!
वीरेंद्र सेहवाग आणि पत्नी आरतीच्या नात्यात तणाव? घटस्फोटाच्या चर्चांना उधाण
मुंबई : भारतीय क्रिकेट (cricket) संघातील खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर सध्या अनेक चर्चा सुरू आहेत. गेल्या काही महिन्यांत काही खेळाडूंच्या नातेसंबंधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या वर्षी हार्दिक पंड्याने घटस्फोटाची घोषणा केली. टी-२० वर्ल्डकप जिंकून आल्यानंतर हार्दिक व त्याची पत्नी नताशआ यांनी वेगळं होत असल्याची अधिकृत घोषणा केल्याने सर्वांनाच धक्का बसला. तर गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघातील क्रिकेटपटून युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या नात्याबद्दलही उलटसुलट चर्चा ऐकायला येत आहे. हे कमी की काय म्हणून आता भारताच्या एका दिग्गज, माजी खेळाडूच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही वेगवेगळे दावे, चर्चा ऐकायला मिळत आहेत. आता या चर्चांमध्ये भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी आरती यांच्या नातेसंबंधांबद्दलही तर्कवितर्क लावले जात आहेत.
सेहवाग-आरतीच्या नात्याबद्दल चर्चा
मिळालेल्या माहितीनुसार, वीरेंद्र सेहवाग आणि आरती यांचा तब्बल २१ वर्षांचा संसार मोडण्याच्या उंबरठ्यावर आहे. रिपोर्टनुसार, दोघेही सध्या वेगवेगळे राहत आहेत आणि लवकरच त्यांचा घटस्फोट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, सेहवागने सोशल मीडियावर पत्नीला अनफॉलो केले असून, त्याच्या अलीकडच्या पोस्ट्समध्येही पत्नीसोबतचे फोटो दिसत नाहीत.
दिवाळी सणाच्या वेळी सेहवागने त्याच्या मुलं आणि आईसोबतचे फोटो शेअर केले होते, मात्र त्यामध्ये आरती कुठेच दिसली नाही. त्यामुळे चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.
सेहवाग-आरतीची प्रेमकहाणी आणि लग्न
वीरेंद्र सेहवाग आणि आरती यांचे लग्न २००४ मध्ये झाले होते. हे प्रेमविवाह होते, परंतु त्यांच्या कुटुंबातील काही लोक या लग्नाला विरोध करत होते. सेहवाग आणि आरतीने त्यांच्या कुटुंबीयांची समजूत काढत तत्कालीन केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निवासस्थानी मोठ्या थाटामाटात लग्न केले होते. हे लग्न विशेष चर्चेत आले होते, कारण त्याच्या एका महिन्याआधीच सेहवागने पाकिस्तानविरुद्ध मुलतानमध्ये त्रिशतक झळकावले होते.
मुलं क्रिकेटमध्ये सक्रिय
सेहवाग आणि आरतीला आर्यवीर आणि वेदांत अशी दोन मुले आहेत. त्यांच्या मुलांनी क्रिकेटमध्येही आपली सक्रियता दाखवली आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंब एकत्र असल्याचे कायम वाटत होते. मात्र, आता सेहवाग-आरतीच्या नात्यात तणाव असल्याची चर्चा रंगली आहे.
घटस्फोटाच्या अफवा किती खऱ्या?
सेहवागच्या वैयक्तिक आयुष्यात यापूर्वी कधीच अशा अफवा ऐकायला आल्या नव्हत्या. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या नात्यात तणाव असल्याचे बोलले जात आहे. दोघांकडून अद्याप यावर कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही.
क्रिकेटच्या मैदानावर स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला वीरेंद्र सेहवाग आता आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. या चर्चांवर दोघांनीही प्रतिक्रिया दिल्यास याबाबतची अधिकृतता स्पष्ट होऊ शकते.