मुंबई : कुर्ला येथील अपघातानंतर चर्चांच्या फैरी झडल्या असल्या तरी बेस्टच्या बसेसचे अपघात आटोक्यात आलेले नाहीत. बेस्टच्या भाडेतत्वावरील गाड्यांमुळे होणाऱ्या अपघातांचे सत्र अद्यापही सुरूच आहे. गोराई आगाराच्या परिसरात मंगळवारी अशाच एका अपघातात एका तरुणाचा जीव गेला. गोराई परिसरात बेस्टच्या बसचा या महिन्यातील हा तिसरा अपघात आहे.
बेस्टच्या भाडेतत्वावरील गाडीला कुर्ला येथे झालेल्या भीषण अपघातानंतर बेस्टच्या अपघातांच्या अनेक घटना बाहेर येऊ लागल्या आहेत. गोराई परिसरातही बेस्टच्या भाडेतत्वावरील बसने अपघात केल्याच्या तीन घटना या महिन्यात घडल्या आहेत. त्यातच मंगळवारी २१ जानेवारी रोजी झालेल्या अपघातात एका तरुणाने जीव गमावल्यामुळे या अपघातांचे गांभीर्य वाढले आहे. मंगळवारी झालेल्या अपघातात बसच्या चाकाखाली आल्यामुळे याच परिसरात राहणाऱ्या वैभव कांबळे याचा मृत्यू ओढवला.
Jalgaon Train Accident : जळगावात रेल्वे दुर्घटना, १५ प्रवाशांचा मृत्यू
गोराई बसआगाराच्या लगत आकाशवाणी जवळ एल टी मार्ग येथे मंगळवारी सायंकाळी हा अपघात घडला. यावेळी दुचाकीला बेस्टच्या बसगाडीची धडक लागल्यामुळे अपघात झाला आणि दुचाकीस्वार बसच्या मागील चाकात येऊन त्याचा अपघात झाला. वैभव हा याच परिसरातील नंदनवन इमारतीत राहत होता. एकुलता एक मुलगा गमावल्यामुळे त्यांच्या कुटंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.